एलईडीसह पर्ससीननेटच्या मासेमारीलाही आपला विरोध ; आमदार वैभव नाईक

0
95

मालवण | प्रतिनिधी | दि. १९ : पारंपरिक मच्छीमारांना मत्स्यव्यवसाय विभागाकडून सुधारीत पत्र उपोषणकर्त्यांना दिले आहे. केंद्र शासनाकडे राज्य शासनाकडून केलेल्या पाठपुराव्याची माहितीही त्यांना दिली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात एलईडी मासेमारीविरोधात कडक कायदा केला जाणार आहे. शिवसेना आणि सरकार पारंपारिक मच्छीमारांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आपले नुकसान करून उपोषण न करता पारंपरिक मच्छीमारांनी साखळी उपोषण मागे घ्यावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी मच्छीमारांना केले.

पारंपारिक मच्छीमारांनी सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांना काल मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी मच्छीमारांच्या मागणीनुसार पत्र देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र या पत्रावर पारंपरिक मच्छीमार समाधानी नव्हते त्यांनी या पत्रावर काही प्रश्‍न उपस्थित करत याचा खुलासा मत्स्यव्यवसाय विभागाने करावा अशा मागणीचे पत्र दिले. या पार्श्‍वभूमीवर आज सायंकाळी आमदार वैभव नाईक यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह अन्य मच्छीमार बांधव, महिला उपस्थित होत्या. यावेळी उपोषणकर्त्यांना मत्स्यव्यवसाय खात्याच्यावतीने सुधारीत पत्र देण्यात आले.
आमदार नाईक म्हणाले, पारंपरिक मच्छीमारांना सुधारीत पत्र देण्यात आले आहे. एलईडी व अवैधरीत्या होणार्‍या पर्ससीनच्या मासेमारीवर कारवाईसाठी आता सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील सातही अधिकार्‍यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे त्यांच्याकडून अवैध मासेमारीवर कारवाई केली जाईल. केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या कारवाईच्या विषयाबाबत राज्य शासनाकडून आवश्यक तो पाठपुरावा करण्यात आला आहे. राज्याच्या जलधी क्षेत्रात होणार्‍या एलईडी मासेमारीवर कडक कारवाईसाठी येत्या पावसाळी अधिवेशनात कडक कायदा करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी निवती रॉकनजीकच्या समुद्रात परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सधारकांकडून मत्स्यव्यवसाय खात्याच्या गस्तीनौकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या अनुषंगाने संबंधित सहा ते सात हायस्पीड ट्रॉलर्सविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या नौका कर्नाटकात जाऊन पकडल्या जाणार आहेत. शासनाकडून मच्छीमारांना जी मदत आहे ती आपण करत आहोत. सरकार आणि शिवसेना म्हणून आम्ही पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी आहोत. मच्छीमारांच्या उपोषणाला आपला पाठिंबा आहेच मात्र सध्या मासेमारी हंगाम असल्याने आपले नुकसान न करता पारंपरिक मच्छीमारांनी साखळी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती आमदार नाईक यांनी केली.
रत्नागिरीतील एलईडी व पर्ससीन नौकांना पालकमंत्री उदय सामंत यांचाच वरदहस्त असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. याबाबत विचारले असता आमदार नाईक यांनी पालकमंत्र्यांचा एलईडी, पर्ससीननेटच्या मासेमारीला विरोध आहे. जिल्ह्याच्या सागरी हद्दीत एलईडी, पर्ससीनची अनधिकृतरीत्या होणार्‍या मासेमारीला आपलाही विरोध आहे. त्यामुळेच ही मासेमारी रोखण्यासाठी कडक कायदा येत्या काळात केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.