भारताच्या विजयात ‘युवा ब्रिगेड’ चमकले

0
339

पूणे : भारताने इंग्लंडवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या विजयात भारताचे युवा वेगवान गोलंदाज चांगलेच चमकले. पदार्पण करणाऱ्या प्रसिध कृष्णन आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी तीन विकेट्स मिळवत भारताला विजय मिळवून दिला. भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडपुढे ३१८ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान इंग्लंडला यशस्वीरीत्या पेलवता आले नाही.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी १३५ धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. पण त्यानंतर प्रसिधने पदार्पण करताना भारताला पहिले यश मिळवून दिले. प्रसिधने यावेळी जेसन रॉयला ४६ धावांवर बाद केले आणि इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर प्रसिधने बेन स्टोक्स आणि सॅम बिलिंग्स यांना माघारी धाडत तीन विकेट्स पटकावले. युवा शार्दुलने यावेळी स्थिरस्थावर झालेल्या बेअरस्टोला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. बेअरस्टोने यावेळी ९४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यानंतर शार्दुलने कर्णधार इऑन मॉर्गन आणि जोस बटलर यांचा काटा काढला आणि भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.

सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांच्या पाठोपाठ केएल राहुल आणि क्रुणाल पंड्या यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडला विजयासाठी ३१७ धावांचे आव्हान दिले आहे. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक ९८ धावा केल्या. त्याचे शतक फक्त दोन धावांनी हुकले. भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली. खेळपट्टी आणि इंग्लंडच्या गोलंदाजीमुळे भारताला वेगाने धावा करता आल्या नाही. सलामीच्या जोडीने अर्धशतकी भागिदारी केली. १६व्या षटकात बेन स्टोक्सने रोहित शर्माला २८ धावांवर बाद केले आणि भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने शिखर सोबत तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. या दोघांनी १०५ धावांची भागिदारी केली. ही जोडी चांगली खेळत असताना विराट कोहली ५६ धावा करुन बाद झाला.

शतकाजवळ पोहोचलेला शिखर ९८ धावांवर बाद झाला. शिखरने १०६ चेंडूत २ षटकार आणि ११ चौकारांसह ९८ धावा केल्या. त्याला बेन स्टोक्सने बाद केले. तर हार्दिक पंड्या १ धावाकरून माघारी परतला. हार्दिक बाद झाला तेव्हा भारताने ४०.३ षटकात २०५ धावा केल्या होत्या. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या क्रुणाल पंड्याने केएल राहुल सह अखेरच्या १० षटकात फटके बाजी केली आणि धावांचा वेग वाढवला. या दोघांनी ५६ चेंडूत १०० धावांची भागिदारी केली. भारताने अखेरच्या १० षटकात ११२ धावा केल्या. राहुलने ४३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६२ धावा केल्या. तर क्रुणालने ३१ चेंडूत ५८ धावा केल्या. यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.