सोशल मिडीयावरून बदनामी करणंं थांबवा ; दुसरी बाजू पण समजून घ्या ; यशवंतगड प्रकरणी रेडी ग्रामस्थांचे आवाहन 

0
615
सावंतवाडी । प्रतिनिधी । दि. २ : यशवंतगड प्रकरणी जो कोणी ग्रामस्थांना  अपशब्द बोलला त्याने येऊन माफी मागावी अशी अपेक्षा धरली तर त्यात चुकीचे काय, असा सवाल रेडी ग्रामस्थांनी केला आहे. एखाद्या प्रकरणात दुसरी बाजू सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे,  एकच बाजू ऐकून आज सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी आपला राग व्यक्त करत आहे. त्यांनी खरी आणि सत्यता पडताळून पहावी  आणि नंतरच आपला राग व्यक्त करावा, अशी विनंती रेडी ग्रामस्थांच्या वतीने बंड्या गवंडी, अण्णा गडेकर, स्वप्नील राणे, अंकुश राणे, श्रीकांत राऊळ, गोपाळ राऊळ, निलेश रेडकर, विवेक राणे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केली केली.
 प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, सध्या रेडी गावामध्ये चर्चेला आलेला एक विषय. यशवंतगड आणि त्यावर घडलेलं नाट्य. रेडी गाव आणि पंचक्रोशीतील होतकरू कलाकार मुलांनी एकत्र येऊन एका मराठी गाण्यावर तेही हिंदूंच्या होळी या पवित्र सणावर आधारित गाण्यावर एक सुंदर, पूर्ण कपड्यात तेही पारंपरिक कपडे परिधान करून नृत्य सादर केले. त्याचे व्हिडिओ काढून YouTube या प्रसार माध्यमावर प्रसारित केले. उघड्या आणि निकोप डोळ्यांनी ते पाहिले तर त्यात अश्लील किंवा आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही आहे. असे असताना काही लोकांना त्यात अश्लीलता, घाणेरडेपणा आणि वाईट काहीतरी दिसले. त्यावर त्यांनी ‘गड तुमच्या बापाचा आहे का? चोप देऊ ! कुत्र्याची पिलावळ !’ असे अनेक अपमानास्पद शब्द वापरले. त्याही पुढे जाऊन रेडी ग्रामस्थ ड्रग्ज (अंमली पदार्थ) विकण्यासाठी आणि सप्लाय साठी सहकार्य करतात अशी मुक्ताफळे उधळली. तेही व्हॉट्सअँप सारख्या सोशल मीडियावर. तेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असणाऱ्या शिवप्रेमी या ग्रुप वर.
 त्या ग्रुप वर आणि शिवप्रेमी चळवळीत रेडी मधील पण मुलं-मुली आहेत. अतिशय स्तुत्य आणि शिवकार्य करत आहेत ही मुलं. पंचक्रोशीमधील लोक यात सामील असतात.  त्यांच्या सोबत रेडी ग्रामस्थ पण असतात. असे असताना रेडी गाव आणि ग्रामस्थ यांच्याबाबत अशी बदनामकारक भाषा वापरणे किती योग्य आहे. त्या वापरलेल्या अतिशय घाणेरड्या शब्दांचा एक संवेदनशील ग्रामस्थ म्हणून राग येणे हे साहजिकच आहे. त्यावर गावातील लोक आक्रमक झाले. आणि त्यांनी जे कोण बोलले त्यांना समोर येऊन माफी मागण्याचे आवाहन केले. यात काय चूक आहे? इतर शिवप्रेमी बद्दल कोणीही वाईट बोलले नाही.  कारण रेडी मधील लोक पण शिवप्रेमी आहेत आणि शिवकार्यात  वेळोवेळी भाग घेतात.
 जो पर्यंत ते बोलणारे लोक येऊन गावाची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांनी गडावर येऊ नये, अशी मागणी लावुन धरली यात गैर काय आहे? इतर कोणत्याही शिवप्रेमींना किंवा कोणत्याही गावातील ग्रामस्थांना किंवा पर्यटकांना गडावर येण्यास विरोध केला नाही आणि कोणीच करणार नाही. असे असताना काही जण स्वतःला शिवप्रेमी म्हणणारे समाजामध्ये गैरसमज पसरवत आहेत की शिवप्रेमींनी रेडी ग्रामस्थांनी येण्यास बंदी घातली आहे. उगाच नको नको त्या अफवा पसरवत आहेत ज्याने समाजामध्ये आणि रेडी पंचक्रोशी मध्ये रेडी ग्रामस्थांबद्दल वाईट विचार पसरत आहे, असा कोणताच रेडीवासीय कोणाबद्दल वाईट बोलला नाही आणि कोणालाही गडावर येण्यास विरोध केलेला नाही. फक्त ज्यांनी कोणी गावाची आणि गावातील मुलांची बदनामी केली त्यांनी माफी मागावी हीच मागणी होती आणि कायम राहील.
महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहेत. शिवप्रेमी आहेत. महाराज प्रत्येकाच्या रक्तात सामावले आहेत. मग रेडी ग्रामस्थ त्याला अपवाद कसे असतील. उगाच काहीही बोलून गावाची आणि ग्रामस्थांची बदनामी करू नये. आज इतर लोकांसमोर काही लोक आपली बाजू मांडताना एकच बाजू मांडत आहेत तीही चुकीच्या पद्धतीने. दुसरीही बाजू समजून घ्या. एकच बाजू ऐकून आज सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी आपला राग व्यक्त करत आहे. त्यांना विनंती आहे. खरी आणि सत्यता पडताळून पहा आणि आपला राग व्यक्त करा. रेडी मध्ये पण शिवप्रेमी आहेत आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहेत. तेव्हा अर्धवट कोणाचे ऐकून माथी भडकवणे कधीही वाईटच. संपूर्ण शिवप्रेमींना कोणताच विरोध नसून विरोध आहे तो त्या तीन चार लोकांना, ज्यांनी गावाबद्दल आणि ग्रामस्थांबद्दल आक्षेपार्ह बोलले त्यांना. अशा आशयाचे निवेदन रेडी ग्रामस्थ म्हणून बंड्या गवंडी, अण्णा गडेकर, स्वप्नील राणे, अंकुश राणे, श्रीकांत राऊळ, गोपाळ राऊळ, निलेश रेडकर, विवेक राणे व समस्त रेडी ग्रामस्थ यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.