ग्रामसेवक धमकी प्रकरण ; शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

0
249

कणकवली | प्रतिनिधी | दि. ०८ : तोंडवली-बावशी ग्रामपंचायत टेंडर ठरावाची प्रतिसाठी सरपंच यांच्या सूचनेनुसार लेखी मागणी अर्ज द्यावा, असे सांगितल्याचा राग धरुन तीन आरोपींनी शिवीगाळ, मारहाण करण्याची धमकी दिल्याची फिर्याद ग्रामसेवक सचिन आनंद पवार यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार तोंडवली-बावशी येथील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तोंडवली बावशी ग्रामपंचायत येथे गुरुवारी सकाळी ११ वाजता अतुल वासुदेव सदडेकर, वय ५६, मंदार राजाराम कुलकर्णी, वय ३५, प्रकाश रामचंद्र मेस्त्री, वय २८ सर्व रा. तोंडवली बावशी यांनी ग्रामपंचायतीत येत ग्रामसेवक सचिन पवार यांच्याकडे टेंडर प्रत मागितली. प्रत हवी असल्यास लेखी मागणी अर्ज द्या, असे ग्रामसेवक पवार यांनी सांगितले. या रागाने अतुल सदडेकर यांनी शिवीगाळ केली. मी मुंबईचा गुंड आहे, तुला मारून टाकेन अशी धमकी दिली. मंदार कुलकर्णी याने ठरावाची प्रत देण्यास सांगत कामाला लावू अशी धमकी दिली. प्रकाश मेस्त्री याने ठरावाची प्रत द्या , नाहीतर बीडीओला सांगून कामाला लावतो अशी धमकी दिली, अशी फिर्याद ग्रामसेवक सचिन पवार यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्या

नुसार संशयित आरोपी अतुल सदडेकर, मंदार कुलकर्णी, प्रकाश मेस्त्री या तिघांवर भा.दं. वि. कलम ३५३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी अतुल सदडेकर, प्रकाश मेस्त्री यांना अटक करण्यात आली आहे. तर कुलकर्णी या आरोपीला अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे तिन्ही आरोपी शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आहेत. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटील करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.