आता आरोग्य विभागाच्या साथीला शिक्षण विभागही..!

0
2044

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी | दि. ०८ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांच्या नोंदी ठेवण्यासाठी आरोग्य विभागाला मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५ रेल्वे स्थानक आणि ६ चेक पोस्ट वर ८८ प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. याबाबत आरोग्य विभागाने या शिक्षकांची शिक्षण विभागाकडे मागणी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात काही निर्बंध घातले आहेत. शिवाय पर जिल्ह्यातून आणि पर राज्यातून येणाऱ्या नागरिकांना आर टी पी सी आर तपासणी प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक केले आहे. तसेच ते नसल्यास त्वरित तपासणी करून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र सद्यास्थिती जिल्ह्यात आढळत असलेले रुग्ण, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी लागणारे कर्मचारी, लसीकरण साठी कर्मचारी नियुक्त केल्याने आणि अनेक पदे रिक्त असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. तसेच पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी ठेवताना ही अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणावरून परजिल्ह्यातील नागरिक जिल्ह्यात दाखल होतात असे चेक पोस्ट , रेल्वे स्थानके आदी ठिकाणी दाखल होणाऱ्या नागरिकांच्या नोंदी ठेवण्यासाठी आणि त्यांनी आर टी पी सी आर तपासणी केली आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी आरोग्य विभागाला कर्मचारी वर्गाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना कालावधीत रेल्वे स्थानक आणि चेकपोस्ट येथे नोंदी ठेवण्यासाठी शिक्षक मिळावेत अशी मागणी एका पत्राद्वारे आरोग्य विभागाने शिक्षण विभागाकडे केली आहे.

या पत्रानुसार आरोग्य विभागाने ८८ शिक्षकांची मागणी केली आहे. हे शिक्षक वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रेल्वे स्थानक, खारेपाटण, करुळ, फोंडा, पत्रादेवी, सातार्डा, आंबोली या चेक पोस्ट वर या शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जाणार असून सकाळी ८ ते दुपारी २ वा. तर दुपारी २ ते रात्री ८ वा. अशा दोन सत्रात ४-४ शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. तसेच रेल्वे स्थानक व चेकपोस्ट येथे दाखल होणाऱ्या नागरिकांच्या नोंदी ठेवणे, त्यांच्याकडे आर टी पी सी आर तपासणी प्रमाणपत्र आहे का याची खात्री करणे, नसल्यास त्यांना तपासणी केंद्रात दाखल करणे ही जबाबदारी देण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.