…अन्यथा एक मे रोजी करणार आत्महत्या : नाडगौडा

0
751

महाराष्ट्र : शिक्षकेतर कर्मचारी आकृतिबंध रद्द करा अन्यथा एक मे रोजी आत्महत्त्या करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनाचे राज्याध्यक्ष सतीश नाडगौडा यांनी महाराष्ट्र शासनास पत्राद्वारे कळविले असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे व जिल्हा कार्यवाह गजान नानचे यांनी कळविले आहे.माध्यमिक उच्च माध्यमिक खाजगी शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी आकृतीबंध 20 वर्षापासून लागू केल्याने महाराष्ट्र राज्यामध्ये शाळांतील ७०००० कर्मचारी पदं रद्द करण्यात आली असून, सुशिक्षित बेकारांची संख्या वाढली आहे तसेच अन्यायकारक आकृतीबंध शासनाने लागू केला असून शासनाने त्वरीत शिक्षकेतर आकृतिबंध रद्द करावा, अन्यथा 1 मे २०२१ महाराष्ट्र व कामगार दिन रोजी आत्महत्या करण्यास शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी सतीश नाडगौडा, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटना यांनी केली आहे.


पुरोगामी महाराष्ट्राच्या आजच्या महाविकास आघाडी शासनाने आपल्या पूर्वीच्याच आघाडी शासनाच्या १९९९ ते २०१४ या काळातील शिक्षण सचिवांनी एकतर्फी प्रस्तावित करून, विधीमंडळ व न्यायालयीन निर्देशांना डावलून, मान्यताप्राप्त खाजगी शाळांतील शिक्षकेतर पदांकरिताचा अन्यायकारक आकृतिबंध लादला असून, सध्या त्याची जुलमी अंमलबजावणी सुरू केली आहे, मूळ शिफारस व प्रस्तावात नसलेली कर्मचारी वर्ग ४ ची पद कंत्राटी पध्दतीने मानधनावर भरण्याचा अव्यवहार्य निर्णय घेतला, त्यामुळे विद्यमान कार्यरत व्यक्तिंवर परिणाम होत नसल्याने, संघटनात्मक पातळीवर न्यायालयीन प्रक्रीया करता येऊ शकत नाही (वास्तविक यांत संस्थाचालकांचेच जास्त नुकसान व अडचण होणार असल्याने, त्यांनी आपल्या संस्थेच्यावतीने आणि/किंवा त्यांच्या महामंडळाच्यावतीने न्यायालयीन प्रक्रीया पार पाडणे गरजेचे होेते व आहे )
शिक्षकेतर आकृतिबंध शासन निर्णय दि.२३/१०/२०१३ नुसार नकारात्मक कारवाई न करण्याचे व सन २०१२-१३ ची संचमान्यता यथास्थिती राखण्याचे निर्देश मा. उच्च न्यायालयाने देऊनही शासनाने त्याची पूर्णत: दडपशाही करित न्यायालयाचा अवमान केला आहे हे राज्य संघटनेच्या माध्यमातून वारंवार स्पष्ट केले आहे .
शिक्षण सचिवांनी जाने.’१९ च्या हेकेखोेर निर्णयाची जुलमी अंमलबजावणी सुरू केली आहे, राज्यात करोनाची स्थिती स्फोटक बनते आहे, मिशन ब्रेक द चेन अंतर्गत लाॅकडाऊन व ईतर निर्बंध असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आंदोलन करण्याचा मार्ग बंद झाला आहे . त्यामुळे सर्व पर्याय बंद झाले असल्याने, या प्रश्नाकडे लक्ष वेधून , समायोजनाच्या प्रक्रीयेस स्थगिती मिळण्याबरोबरच शिक्षकेतर कर्मचारी आकृतिबंधाचा सर्वमान्य निर्णायक निर्णय व्हावा याकरिता महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्ताने दि.०१ मे २०२१ रोजी आत्महत्त्या करण्यास शासनाची परवानगी मागितली असल्याचे महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष सतीश नाडगौडा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.