मॉस्को चित्रपट महोत्सवात मराठीचा गौरव ; ‘पगल्या’ला मानाचा पुरस्कार ; कोविडचं संकट भेदून ‘पगल्या’ची झेप पुरस्कारांच्या ‘गोल्डन ज्युबिली’कडं !

0
335

पणजी | अर्जुन धस्के | दि. 13: मुलांचं भावविश्व अतिशय प्रभावीपणे उभं करणा-या पगल्या या मराठी चित्रपटानं आपली आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची घोडदौड चालुच ठेवलीय. नुकत्याच झालेल्या माॅस्को चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ठ परदेशी भाषा चित्रपट पुरस्कारानं पगल्याचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, कोविडच्या संकटाला भेदून विविध आंतरराष्टीय चित्रपट महोत्सवात 45 हून अधिक पुरस्कार पटकावणा-या पगल्याची झेप आता पुरस्कारांच्या ‘गोल्डन ज्युबिली’कडं सुरू आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळं मानवी भावभावनांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. अशा स्थितीत वेगवेगळया वातावरणात, संस्कारात वाढलेल्या मुलांचं भावविश्व काय असतं? याचं अतिशय भावस्पर्शी चित्रण या चित्रपटात आहे. दिग्दर्शक विनोद सॅम पीटर यांनी ही छोटीशी कथा खुप ताकदीनं उभी केलीय. डाॅ. सुनिल खराडे यांची ही कथा आहे. सुरवातीला लघुपटासाठी लिहीली गेलेली ही कथा दिग्दर्शक विनोद यांनी अतिशय कौशल्यानं मोठया चित्रपटात रूपांतरीत केली. इतकंच नव्हे, लहान मुलं, प्राणी यांच्यासोबत काम करण्याचं शिवधनुष्य पेललं. यात अनेक अडथळे आले. कोविडचं संकट आलं. त्यावर मात करत शुटींग पुर्ण केलं. एडीटींग, पार्श्वसंगीत यासाठीही मोठी कसरत करावी लागली. बरेच काम ऑनलाईन करावं लागलं. चित्रपट तयार झाला तेव्हा कोरोनाच्या संकटानं थैमान घातलं होतं. मग पगल्याचा प्रवास सुरू झाला तो जगभरातल्या चित्रपट महोत्सवांमधून. यात सुरवातीपासूनच पगल्यानं जगभरातल्या चित्रपटरसिकांना जिंकलं. लंडन, इटली, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, फिलीपाईन्स, तुर्कस्तान, इराण, अर्जेंटिना, लेबनाॅन, बेलारूस, रशिया, कझागिस्तान, स्पेन, इस्राईल, युएसए, कॅनडा अशा विविध देशातल्या चित्रपट महोत्सवांत पगल्यानं मानाच्या पुरस्कारांवर आपली मोहोर उठवली. कॅलिफोर्नियातल्या चित्रपट महोत्सवात तर पगल्यानं अनेक सन्मान पटकावले. यात सर्वोत्कृष्ठ अभिनेता गणेश शेळके, सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री पुनम चांदोरकर, सर्वोत्कष्ठ पार्श्वसंगीत संतोष चंद्रन, सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक विनोद सॅम पीटर या वैयक्तीक पुरस्कारांसह सर्वोत्कृष्ठ चित्रपट म्हणुनही पगल्याचा सन्मान झाला.
नुकत्याच झालेल्या माॅस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पगल्याला सर्वोत्कृष्ठ परदेशी भाषा चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. कोविडच्या संकटकाळातही पगल्यासारख्या मराठी चित्रपटानं जगभरात मिळवलेला सन्मान खरंच मराठी मनाला अभिमानास्पद असाच आहे. या संकटकाळातही तब्बल 45 हुन अधिक पुरस्कार पटकावणा-या पगल्याची घोडदौड आता पुरस्कारांच्या गोल्डन ज्युबिलीकडं सुरू आहे.
दरम्यान, यासंदर्भात ‘गोवनवार्ता लाईव्ह’शी बोलताना दिग्दर्शक विनोद सॅम पीटर म्हणाले की, माॅस्को चित्रपट महोत्सवातल्या या पुरस्कारामुळं निश्चितच आनंद झाला आहे. आम्ही सर्वांनी केलेल्या कष्टाला मिळालेली ही पोहोच आहे. देशभरात या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतिक्षा आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातुन जगभरातल्या रसिकांचं प्रेम आम्हाला लाभलं आहे. यामुळं आम्हा सर्वांना एक नवी प्रेरणा मिळत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.