सर्व रुग्णांसह नातेवाईकांचीही होणार कोरोना टेस्ट : पालकमंत्री 

0
1305

कणकवली | प्रतिनिधी | दि. १७ : सिंधुदुर्गात येणार्‍या प्रत्येकाची रॅपिड अँटिजन टेस्ट किंवा आरटीपीआर टेस्ट करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. त्यानुसार खारेपाटण चेकनाक्यावर आलेल्या प्रत्येकाची टेस्ट केली जातेय. याखेरीज शासकीय रूग्णालयात तसेच कोविड सेंटरमध्ये रूग्णांना भेटण्यासाठी येणार्‍या नातेवाईकांचीही कोरोना टेस्ट केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

तसेच नारायण राणे आणि काही विरोधक मंडळी मुख्यमंत्री पिंजर्‍यात बसल्याची टीका करताहेत.पण जर मुख्यमंत्री पिंजर्‍यात असतील तर पंतप्रधान मोदी कुठे बसलेत याचेही उत्तर विरोधकांनी द्यावं असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी आज लगावला. तसंच जे आरोप मुख्यमंत्र्यांवर होतात तेच आरोप पंतप्रधानांनाही लागू पडतात हे देखील विरोधकांनी लक्षात घ्यावं असेही ते म्हणाले सिंधुदुर्गात आरोग्य यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आज आपण सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकात आल्यानंतर आरोग्य कर्मचार्‍यांनी थांबवले आणि माझी आरोग्य तपासणी केली. पालकमंत्री म्हणून वेगळा न्याय त्यांनी लावला नाही याचा मलाही अभिमान आहे. असेही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथील तहसील कार्यालयात बैठक सांगितले. यावेळी आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, पोलिस निरीक्षक श्री.मुल्ला, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय पोळ यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

.सामंत म्हणाले, कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने काम करतात ते संपूर्ण महाराष्ट्रातील जनता बघतेय. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना आम्ही फारसे महत्व देत नाही. उलट काम करण्याला प्राधान्य देतोय. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशमधील परिस्थिती पहावी. तेथील अनेक भागात स्मशानात मृतदेह ठेवण्यासाठी जागा राहिलेली नाही. एकाचवेळी अनेक चिता पेटलेल्या दिसताहेत. त्याबाबतचे व्हीडीओ देखील व्हायरल होताहेत तेही पहायला हवेत. त्यामुळे महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गात खूप चांगले काम आरोग्य यंत्रणा करत आहे असे सामंत यांनी सांगितले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.