‘त्या’ विलगिकरण कक्षाचे काय झाले ? मनसेचा सवाल

0
156

मालवण : दि 10 : जिल्ह्यातील इतर नगरपालिका क्षेत्रात त्यांनी विलगिकरण कक्ष सुरू केले आहेत. मात्र, स्वतःच्या मतदारसंघात सत्ता असूनही मालवण शहरात आमदार वैभव नाईक विलगिकरण कक्ष सुरू करू शकले नाहीत. पावसाच्या गळतीमुळे एका विलगीकरण कक्षाचे काम रखडले आहे. रुग्ण तेथे दाखल होण्याच्या मनस्थितीत नाहीत. फक्त घोषणा आणि फोटोसेशन करण्यातच आमदार व्यस्त आहेत. त्यामुळे आमदारांनी पोकळ घोषणाबाजी न थांबवल्यास मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली कोविड काळात केलेल्या खोट्या आश्वासनांचे मनसे प्रदर्शन भरवणार असल्याचे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

इब्रामपूरकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, जिल्ह्यातील अन्य नगरपालिका क्षेत्रात विलगीकरण कक्ष आहे. सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. परंतु स्वतःचे कार्यक्षेत्र असलेल्या व सत्ता असलेल्या मतदारसंघात मालवण नगरपालिकेचे विलगीकरण कक्ष सुरू करू शकत नाहीत. हा विलगीकरण कक्ष गळणार्‍या जागेत सुरू करण्याच्या प्रयत्न आहे. त्यावर रंगरंगोटी करून पैसे खर्च केले जात आहेत. फक्त आमदारांना पैसे खर्च करण्यातच रस आहे. परंतु ते सुरू करून आजवर किती जण राहिले की सोडून अन्य ठिकाणी गेले, तेथे थांबण्यास रुग्ण का तयार नाहीत, याची माहिती घ्यावीशी वाटत नाही हे मालवणवासियांचे दुर्दैव म्हणावे लागेल. विलगीकरण कक्षात गरम पाणी, सुसज्ज शौचालय आवश्यक आहे. आज गावागावातही विलगीकरण कक्ष सुरू आहेत. तिथे सुविधा आहेत, कर्मचारी आहेत का? हे आमदारांनी फिरून पाहण्याची आवश्यकता आहे. पण असे होताना दिसत नाही
शासकीय तंत्रनिकेतन येथे मुलींच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू आहे. नजीकच असलेल्या मुलांच्या वसतिगृहातही बेड व आरोग्य सुविधा युक्त कोविड केअर सेंटर सुरू करणार या दीड महिन्यापूर्वीच्या घोषणेचे पुढे काय झाले? तेही स्पष्ट करावे. म्हणूनच आमदारांनी पोकळ घोषणाबाजी न थांबवल्यास मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली कोविड काळात केलेल्या खोट्या आश्वासनांचे मनसे प्रदर्शन भरवेल.
आज तालुकानिहाय सक्रिय रुग्ण संख्येत मालवण तालुका प्रथम क्रमांकावर असून सध्या १३०६ कोविड रुग्ण आहेत. खर्‍या अर्थाने मालवणला अधिक कोविड केअर सेंटर व विलगीकरण कक्षाची गरज आहे. शासनाने गृहविलगीकरण बंद केलेले आहे. सुविधा नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे.पेपरबाजी, घोषणाबाजी, फोटोसेशन करणारे आमदार रुग्णांची काळजी घेऊ शकत नाहीत असेही मनसेच्यावतीने अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.