ऑनलाईन अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना कोविड डयुटीतून वगळा

0
172

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हयातील बहुतांश ८०% शिक्षक आज कोविड डयुटीसाठी आरोग्य विभागाच्या खांद्यालाखांदा लावून काम करत आहेत. परंतु मान. शिक्षण संचालक, पुणे  यांच्या आदेशानुसार दि. १४ जून २०२१ पासून जि.प.शाळांचे ऑनलाईन अध्यापन सुरू करण्याचे  आहे. त्यापूर्वी शिक्षकांच्या पुन्हा एकदा आरटिपीसीआर चाचण्या करून त्यांना किमान १२ जूनपूर्वी तरी कोविड डयुटीतून वगळण्यात यावे.


आज शिक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र, कोविड केअर सेंटर ,अन्य शासकीय रुग्णालये याठिकाणी सकाळी ९ ते ५ यावेळेत डयुटया करत आहेत. त्यापूर्वीच कित्येक शिक्षकांना रेल्वेस्थानक व चेकपोस्ट येथे सकाळी ५ ते रात्री १२.३० पर्यंतच्या कालावधीसाठीच्या नियुक्त्या दिलेल्या आहेत. तसेच पंचायत समितीस्तरावर व तहसीलदार स्तरावर स्थापन केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात व ‘माझा सिंधुदुर्ग व माझी जबाबदारी’ अंतर्गत गावात सर्वेक्षण करणे अशी आणि अनेक प्रकारची कामे आपत्ती व्यवस्थापनात करत आहेत. त्याचबरोबर आता ग्रामस्तरावर स्थापन केलेल्या कोविड पाॅझिटिव्ह विलगीकरण कक्षावरही व्यवस्थापक म्हणून शिक्षकांची आपण सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीसाठी नियुक्ती केलेली आहे.
परंतु शासनाच्या आदेशानुसार ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत प्राथमिक शिक्षकांना ऑनलाईन अध्यापन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व्हिडिओ तयार करणे, स्वाध्याय,  गृहपाठ, चाचण्या यासारखी कामे शिक्षकाला या सुट्टीच्या कालावधीत करायची होती. आपत्ती व्यवस्थापन डयुटी करताना ऑनलाईन शिक्षण तसेच अध्यापनासाठीचे पूर्व नियोजन व शैक्षणिक नियोजने करणे ह्या दुहेरी भूमिकेत शिक्षकाची मानसिकता पूर्णपणे ढासळली आहे. कुठल्याही विभागाला अशाप्रकारे दुहेरी भूमिकेतून काम करणे कठीण आहे. याव्यतिरिक्त लाॅकडाऊन काळातही कुठलीही सोय नसताना शिक्षक वर्ग सगळी ऑनलाईन शासकीय माहिती जिवावर उदार होऊन भरत आहे.
शासकीय पातळीवरून ४५ दिवसाचा इयत्ता २ ते ८ वी साठी ‘ब्रिज कोर्स ‘ उपक्रम नवीन शैक्षणिक वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होईल. त्याची पूर्वतयारी करणेस शिक्षकांना वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या संपूर्ण क्षमतेने शैक्षणिक व आपत्तीचे काम करणाऱ्या शिक्षकाचे मूळ कर्तव्य हे बालकाचे अध्यापन असून त्यासाठी त्याची कोविड डयुटीतून १२ जून २०२१ पूर्वी कार्यमुक्ती करून ऑनलाईन अध्यापनास त्याला पूर्णवेळ दयावा. अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळच्यावतीने गटविकास अधिकारी (वर्ग-१) प. स. कुडाळ यांच्याकडे लेखी करण्यात आलेली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.