दशावतारी कलावंतांच्या मदतीसाठी धावले पत्रकार..!

0
299

कणकवली | प्रतिनिधी | दि. ११ : कोरोनामुळे अवघे जग संकटात आहे. हातावर पोट असलेल्यांचे तर आयुष्य ठप्प झाले आहे. लोककलावंतांची परवड झाली असून सिंधुदुर्गातील दशावतारी कलावंत यांना जीवनावश्‍यक वस्तूंची मदत देण्याचा उपक्रम कणकवली तालुका पत्रकार समितीने आखला आहे. सोमवार दिनांक 14 जून रोजी 11:30 वाजता येथील चौडेश्वरी हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रांताधिकारी वैशाली राजमाने आणि तहसीलदार रमेश पवार उपस्थित राहणार आहेत. यासाठी गुरुकृपा दशावतारी मंडळ हलवलचे मारुती सावंत यांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, सचिव संजय राणे व खजिनदार नितीन कदम यांनी दिली.
राज्यभरातील कलावंतांसाठी ‘पत्रकार आणि मित्र’ व ‘पल्लवी फाउंडेशन’ या दोन संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील तब्बल आठ ते दहा हजार लोककलावंतांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्गमधील दशावतारी कलावंत, रत्नागिरीतील नमन-खेळे, जाखडी कलावंत आणि मुंबईतील शायरी कलापथक, दशावतारी कलावंत यांना ही मदत देण्यात येईल. एका दिवशी तीन ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूर सांगलीतील तमाशा कलावंत आणि सोंगी भजन कलाकार यांना मदत देण्यात येईल असे पत्रकार आणि मित्रचे प्रमुख रजनीश राणे आणि पल्लवी फाउंडेशनचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर यांनी सांगितले.

कणकवलीतील मदत वाटप कार्यक्रमासाठी पत्रकार समितीला हलवल येथील गुरुकृपा दशावतार नाट्य मंडळचे मारुती सावंत, चौंडेश्वरी हॉलचे नाना कांबळी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. पहिल्या टप्प्यात ३०० कलावंतांना मदत केली जाणार बी असली तरी काही दिवसात अजून कलावंतानं पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. हा कार्यक्रम कोविडचे सर्व नियम पाळून आणि मोजक्या कलावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी तालुका पत्रकार समितीच्या सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.