‘त्या’ कोव्हीड सेंटरला एकही रुग्ण नाही…! ‘ते’ नगराध्यक्षांना का नाही जमले…? उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गणेश कुशेंचा सवाल

0
706

मालवण : दि. ११ : कोव्हीड सेंटर सुरु केल्याची घोषणा नगराध्यक्षांनी आठ दिवसांपूर्वी केली आणि आज आठ दिवसांनंतर तिथे एकही रुग्ण नाही हि शोकांतिका नक्की कोणाची? नगराध्यक्षांची कि मुख्याधिकाऱ्यांची..? कणकवली, सावंतवाडी नगराध्यक्षांनी करून दाखवलं ते मालवणच्या नगराध्यक्षांना का जमले नाही ? असा सवाल करत नगराध्यक्षांचा बोलाची कढी आणि बोलाचाच भात असल्याची टीका उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गटनेते गणेश कुशे यांनी केली आहे.

उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि गटनेते गणेश कुशे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगराध्यक्षांवर टीकेची झोड उठवली आहे. आम्ही पत्र देऊन कोव्हीड सेंटर सुरु करण्याची मागणी केली. त्यावर नगराध्यक्षांनी प्रसिध्दी पत्रक देऊन, कोव्हीड सेंटर काम अगोदरच सुरु केल्याचे आणि दोन दिवसात त्याचा प्रत्यक्ष वापर सुरु होईल असे जाहीर केले. हि बाब उपनगराध्यक्ष यांना माहित नाही हि शोकांतिका असल्याचे सांगुन आमच्यावर टिका देखील केली होती. परंतु आज रोजी त्याठिकाणी किती रुग्ण आहेत आणि त्यांना योग्य सुविधा मिळतात कि नाही याची माहिती घेण्यासाठी आम्ही, नगरपरिषद अभियंत्या सौ. सोनाली हळदणकर, महेश परब, मुकादम वळंजू आणि आरोग्य विभागाचे श्री. कोरडे यांच्यासमवेत गेल्यानंतर तिथली परिस्थिती पाहून आपल्याला धक्काच बसला. तिथे एकही रुग्ण वास्तव्यास नव्हता.

कोव्हीड सेंटर सुरु केल्याची घोषणा नगराध्यक्षांनी आठ दिवसांपूर्वी केली आणि आज आठ दिवसांनंतर तिथे एकही रुग्ण नाही हि शोकांतिका नक्की कोणाची? नगराध्यक्षांची की मुख्याधिका-यांची? तिथे पोहोचल्यावर वस्तुस्थिती पाहिली तर रुग्णांना झोपण्यासाठी साध्या चटई, बेड नाहीत, जेवणाची व्यवस्था रुग्णांनी स्वतःची स्वतः करायची, ती सुध्दा स्वतःच्या खर्चाने, स्वच्छतागृह, राहण्याच्या व्यवस्थेपासून जवळ जवळ १०० ते १२५ मीटरवर आहेत, तिथे रात्रीच्या वेळी महिलांनी एकटं कसं जायचं? पाऊस असेल तर महिला आणि पुरुष यांनी स्वच्छतागृहात जायचं कसं? तिथे ना सिक्युरिटी गार्ड, ना परिचारिका, ना डॉक्टर आलेल्या गेलेल्यांची नोंद ठेवण्याची व्यवस्था नाही. ना नगरपरिषदेचा कोणी कर्मचारी, ना आरोग्यविभागाचा, ना महसुलचा अशा अवस्थेत कोण रुग्ण तिथे येऊन राहणार? नगराध्यक्षांना आणि मुख्याधिका-यांना हे माहित नाही का? पावसात ज्याठिकाणी रुग्ण राहण्याची व्यवस्था केली आहे तिथे छपरावरुन पाणी गळत असेल तर रुग्ण तिथे येतीलच. कणकवलीमध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी त्यांची नगरपंचायत असूनही ३० बेडचे कोव्हीड सेंटर कशा पध्दतीने उभं केलेलं आहे आणि तिथे त्यांनी रुग्णांना काय काय सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत ते प्रत्यक्ष जाऊन पहावे. त्याठिकाणी त्यांनी मोफत जेवण, अंडी, पौष्टिक आहार, झोपण्यासाठी बेडस्, आवश्यक औषधे, साफसफाई अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सावंतवाडीत संजू परब यांनीही अद्ययावत कोव्हीड सेंटर उभं केलेलं आहे. एखादी नगरपंचायत अशाप्रकारे चांगल्या सुविधा असलेले कोव्हीड सेंटर उभं करु शकते तर 100 वर्षे पूर्ण केलेली मालवण नगरपरिषद का करु शकत नाही? नगराध्यक्ष ज्या पक्षाचे आहेत त्यांचेच आमदार, खासदार, पालकमंत्री आणि आमदार जे मागतील ते देऊ म्हणणारे मुख्यमंत्री असताना नगराध्यक्ष कमी का पडत आहेत ? सत्ता नसतानाही कणकवलीचे नगराध्यक्ष, सावंतवाडीचे नगराध्यक्ष जे करु शकतात ते मालवणच नगराध्यक्ष का बरे करु शकत नाहीत? कि नगराध्यक्षांची फक्त बोलाचा भात आणि बोलाचीच कढ़ी? असाही सवाल उपस्थित केला आहे.

आज गटार सफाई, शहरातील साचलेला कचरा याविषयी मुख्याधिका-यांची भेट घेऊन शहरात अजून समाधानकारक गटार, नाले, व्हाळया सफाई झालेली नाही याकडे लक्ष वेधले असता मुख्याधिकारी ठेकेदारालाच पाठिशी घालत असल्याचे दिसले. जणू काही तो ठेकेदार नगरपालिकेचा जावईच आहे. पावसाळा सुरु झाला तरी व्हाळ्यांची, गटारांची सफाई न झाल्याने शहरातील अनेक भागात पाणी भरण्याचा धोका निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये नगरपालिकेचे नियोजन काय? कि तोक्ते वादळाप्रमाणे जनतेलाच गटारात उतरुन कामं करायची आहेत? अशा परिस्थितीत नगराध्यक्ष काय करत आहेत? तोक्ते वादळाच्या पूर्वी नगराध्यक्षांचे फोटोसेशन जनतेने पाहिलं. आता पावसाळ्यात सुध्दा तेच का? नगराध्यक्ष साहेब मुख्याधिका-यांवरही तुमचा वचक राहिला नाही का? कै. महेश गिरकर जेव्हा गटार सफाईची काम करत होते तेव्हा नगराध्यक्ष सर्व नगरसेवकांना लेखी पत्र काढून गटार सफाईबाबत आपण समाधानी आहात का? याची विचारणा करत असत. मग मागील वर्षापासून नगराध्यक्षांची हि भूमिका का बदलली? कि गटार सफाईचा पोट ठेकेदार हाच नगराध्यक्षांना अडचणीचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच नगराध्यक्ष याविषयावर बोलणं टाळतात.

आतातरी नगराध्यक्षांनी बाकीच्या गोष्टी सोडून शहरामध्ये लक्ष यावा. कामचुकार ठेकेदारावर कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी असा सल्लाही वराडकर, कुशे यांनी दिला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.