पोलिसांचा धाक दाखवून सुरू असलेली कोरोना तपासणी थांबवा : भालचंद्र साठे

0
360

वैभववाडी | प्रतिनिधी | दि. 18 

पोलीसांचा धाक दाखवून जबरदस्तीने सुरु असलेली कोरोना तपासणी आरोग्य विभागाने थांबवावी. तपासणीच्या नावाखाली होत असलेली धरपकड बंद करावी. अन्यथा उद्रेक अटळ आहे असा इशारा भाजपा जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

तालुक्यात सध्या आरोग्य विभाग सरसकट कोरोना तपासणी करीत आहेत.गावांमध्ये तसेच शहरात पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही तपासणी केली जात आहे. या तपासणीबाबत भाजपचे सरचिटणीस भालचंद्र साठे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.कोरोनाच्या नावाखाली जबरदस्तीने तपासणी केल्या जात आहे. शासनाने संबंधित विभागाला तपासणीचे दैनंदिन टार्गेट दिले आहे का? पोलिसांची भीती दाखवून टेस्टच्या नावाखाली सुरू केलेली धरपकड आरोग्य विभागाने थांबवावी.अन्यथा उद्रेक होईल असा इशारा साठे यांनी दिला आहे.ज्या गावात कोरोना रुग्ण सापडत आहेत. अशा रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची टेस्ट केलीच पाहिजे. मात्र आरोग्य प्रशासन गावात जाऊन सरसकट टेस्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चुकीचे आहे. सध्या भात लावणीचा हंगाम सुरु होत आहे. टेस्ट केलेले रिपोर्ट येण्यास पाच ते सहा दिवस लागत आहेत. यात शेतकऱ्यांना मानसिक त्रास होत आहे.

जिल्ह्यात कोलमडलेली आरोग्य यंत्रणा शासनाने अगोदर सुधारावी. बळी जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. कोवीड सेंटर रुग्णांसाठी समस्येचे आगार बनले आहेत. तिथे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. रुग्णांना चांगली सेवा अगोदर द्यावी. शासनाने गावात विलगीकरण सुरू करण्यास भाग पाडले आहे. त्याठिकाणी काही रुग्ण ठेवण्यात आले आहेत. मात्र त्या कक्षात चार- चार दिवस आरोग्याचा कर्मचारी फिरकत नसल्याचे बोलले जात आहे. तिथे दिवसातून एक वेळ तरी आरोग्य अधिकारी, कर्मचार्‍यांनी भेट द्यावी अशी मागणी भालचंद्र साठे यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.