कृषी विभागाचा पैसा पवारांनी कारखान्यांना वळवला : निलेश राणे

0
109

मालवण | प्रतिनिधी | दि. 01

शरद पवार १५ वर्षे देशाचे कृषिमंत्री होते. त्या पंधरा वर्षात कृषी विभागाचा सगळा पैसा पवारांनी पैस ऊस आणि कारखान्यांमध्ये वळवला. तो पैसा कोकणात का नाही आला ? जोपर्यंत कृषी विभागाचा पैसा कोकणाकडे वळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना काहीही मिळणार नाही. असं परखड मत माजी खासदार निलेश राणे यांनी चिंदर येथे बोलताना व्यक्त केल.

मालवण पंचायत समिती, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत चिंदर यांच्या संयुक्त विद्यमाने चिंदर येथे कृषिदिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. राणे बोलत होते. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, जेरॉन फर्नांडिस, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, चिंदर सरपंच सौ राजश्री कोदे, आचरा सरपंच प्रणया टेमकर, कृषी अधिकारी संजय गोसावी, तालुका कृषी अधिकारी श्री गोसावी, महेश मांजरेकर, धोंडी चिंदरकर, आशिष हडकर यासह पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, शेतकरी उपस्थित होते.

यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले, पूर्वांपार चालत आलेली शेती पुढे आपण करायची म्हणून करू नका. तर शेतीकडे व्यवसाय म्हणून बघा. जिथे फायदा आहे, असाच व्यवसाय करा. ज्या व्यवसायात फायदा नाही तो व्यवसाय करूच नका. आपला शेतकरी पेज आणि भातावर राहता नये, तर तो श्रीमंत होऊन मर्सिडीज घेऊन फिरायला पाहिजे. आपण जे उगवतो, पिकवतो ते विकले गेले पाहिजे. कृषी विभागाचा सर्व पैसा कोकणात आला पाहिजे. मात्र, तसे होत नाही. शरद पवार १५ वर्षे देशाचे कृषिमंत्री होते. मात्र, या १५ वर्षात त्यांनी कृषी विभागाचा सर्व पैसा हा ऊस आणि कारखान्यांकडे वळवला. उर्वरित महाराष्ट्राने काय केलं ? तो पैसा आपल्याकडे का नाही आला ? याचा शरद पवारांना जाब विचारू नये ? जसा कोकणातील शेतकरी तसा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातला शेतकरी आहे. त्यामुळे कोकणच्या हक्काचे पैसे हे कोकणाला मिळालेच पाहिजे. आज बँकेच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतात. मात्र आपल्या बँकेतील जास्तीत जास्त उचल ही पश्चिम महाराष्ट्रातून होते. जोपर्यंत कृषी विभागाचा पैसा कोकणाला मिळत नाही,तोपर्यंत शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नसल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.