कणकवलीत नियुक्ती देण्यास महिला डॉक्टरला नकार | अपमानस्पद वागणूक | आरोग्य भवनाच्या कोल्हापूर शाखेतला प्रकार

0
2082

कणकवली | प्रतिनिधी | दि. 03

कणकवलीत रुग्णसेवेसाठी नियुक्ती मागण्यास गेलेल्या स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अर्पिता अनिल दरीपकर – आरचेकर हिचा अपमान करून नियुक्ती देण्यास नकार आले.हा धक्कादायक प्रकार मुंबई आरोग्य भवनाच्या कोल्हापूर शाखेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून घडला प्रकार

महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्त पदे भरण्यासाठी मेगा भरती जाहिर केली होती. त्यामध्ये कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ञ रिक्त पदासाठी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी म्हणून कणकवलीतील डॉ. अर्पिता अनिल दरीपकर- आरचेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र मुंबई आरोग्य भवनाच्या कोल्हापूर शाखेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेमणूक देण्यास नकार देण्यात आला. तुम्ही कोल्हापूर अथवा औरंगाबादमध्ये नियूक्ती घेवू शकता असे सांगण्यात आले. त्यामुळे डॉ. दरीपकर यांनी अखेर याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व स्थानिक आमदार आमदार नितेश राणे यांना पत्र पाठवून आपल्याला आरोग्य भवनाच्या कोल्हापूर विभागातील त्या अधिकार्‍याकडून मिळालेल्या वागणूकीची माहिती दिली आहे.

शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडून मेगा भरतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आल्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णलयातील वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ञ विभाग पदासाठी डॉ. अर्पिता दरीपकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांना मुंबई आरोग्य भवन येथे मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते. कणकवली येथे एकही स्त्री रोग तज्ञाची जागा उपलब्ध नाही असे सांगण्यात आले. तरीही वैद्यकीय अधिकारी म्हणून तुम्हाला नियूक्ती मिळू शकेल असे सांगत डॉ. दरीपकर यांना कोल्हापूर येथे कार्यालयात जाण्याचे सांगण्यात आले. तेथे कार्यालयात गेल्यानंतर उपस्थित अधिकार्‍याने आपण 20 वर्षापूर्वी कणकवली येथील गडनदीमध्ये पडलो होतो. कणकवली शहर आणि तिथे राहणारी माणसे ही दगा देतात. कणकवलीवासियांबद्दल मी सकारात्मक नाही. त्यामुळे मी तुम्हाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये नियूक्ती देणार नाही, असे त्या अधिकार्‍याने डॉ. दरीपकर यांना सांगितले. एवढ्यावरच न थांबता तुम्ही लेडीज लोक वैद्यकीय अधिकारी म्हणून व्यवस्थित काम करू शकत नाहीत. शिवाय कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकार्‍यांपेक्षा कंत्राटी वैद्यकीय अधिकारी चांगले काम करतात. शिवाय कंत्राटी हे वेतनाच्यादृष्टीने परवडतात त्यामुळे तुम्हाला नियूक्ती देणार नाही असे सांगितले. त्यावेळी डॉ. दरीपकर यांनी आपला मुलगा ११ महिन्यांचा असल्याने सद्यस्थितीत तरी मला कणकवलीत नेमणूक देण्यात यावी अशी विनंती केली असता मूल असणे ही तुमची समस्या आहे. तुम्हाला तुमचा जिल्हा वगळून दुसरा जिल्हा घ्यावा लागेल असे सांगण्यात आले.

आरोग्य भवनाच्या कोल्हापूर येथील कार्यालयातील त्या अधिकार्‍याकडून मिळालेल्या अशा प्रकारच्या वागणूकीमुळे व्यथीत झालेल्या डॉ. दरीपकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपल्याला आलेला अनूभव कथन केला आहे. या पत्रातून त्यांनी शासनाला मी स्त्री असणे, मला मुलगा असणे हा माझा गुन्हा आहेे का? त्या वरिष्ठ अधिकार्‍याचा व्यक्तीशः राग असलेल्या कणकवली, सिंधुदुर्गची मी रहिवासी आहे हा माझा अपराध आहे का? अधिकार्‍याच्या बोलण्यातून माझ्यातील स्त्रीत्वाचा अपमान झाला असून मानसिक धक्का बसला आहे. हेच शासनाचे स्त्री सबलीकरण आहे का? शासनाच्या भरतीमध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपल्या वैयक्तिक बाबी आणणे कितपत योग्य आहे, सिंधुदुर्गात वैद्यकीय अधिकारी मिळत नाही असे सांगितले जाते. परंतू प्रत्यक्षात आरोग्यविभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या रागामूळे तर डॉक्टरांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर नियूक्ती मिळत नाही ना असे सवाल उपस्थित करत आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. या पत्राच्या प्रतीत आरोग्य मंत्री, विरोधी पक्षनेते, महिला आयोग महाराष्ट्र राज्य ,आमदार नितेश राणे यांना पाठविल्या आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.