पोलीस चालकाने शिवीगाळ केल्याने मराठा आक्रमक ; आमदार नितेश राणे, वैभव नाईकांचे ठाण

0
1411
सिंधुदुर्गनगरी : ओरोस येथील पोलीस चालक विठ्ठल कोयंडे यांनी आंदोलनादरम्यान शिवीगाळ केल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला. आमदार नितेश राणे व आमदार वैभव नाईकांनी ओरोस पोलीस ठाण्यात ठाण मांडत पोलीसांना धारेवर धरले. अखेर कोयंडे यांनी माफी मागितल्यावर यावर पडदा पडला. मात्र जोपर्यंत चार मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणेंनी दिलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. कसाल येथील एक बंद गाडी जाळल्याने पोलीसांनी लाठीमार केला. मात्र यात पोलीस आशिष शेटलेकर, ऐहोळी, पोलीस चालक विठ्ठल कोयंडे, महिला पोलीस परब आदी पोलीस जखमी झाले. यानंतर पोलीसांनी शिविगाळ केल्याचा आरोप होतोय. त्यानंतर ओरोस पोलीस ठाण्यात आमदार नितेश राणे दाखल झाले. यावेळी सकल मराठा समाजाने जोरदार घोषणा दिल्या. कोण आला रे कोण आला, कोकणचा वाघ आला, अशा घोषणांनी पोलीस ठाणे परीसर दुमदुमुन गेला. यानंतर आमदार नितेश राणे आक्रमक झाले. जोपर्यंत शिवीगाळ केलेला ‘तो’ पोलीस चालक माफी मागत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणेंनी दिला. सकल मराठा समाजाची जाहीर माफी मागावी, नंतरच आंदोलक घरी जातील अशी भूमिका आमदार नितेश राणेंनी घेतली.  ओरोस पोलीस ठाण्याबाहेर मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती. जातीवाचक शिवी घातलेली मी कदापीही सहन करणार नाही, असे आमदार नितेश राणे यांनी ठणकावले. यानंतर आमदार नितेश राणेंनी जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम यांच्याशी चर्चा केली. यानंतर आमदार वैभव नाईक तिथं दाखल झाले. दरम्यान, पोलीस विठ्ठल कोयंडे यांना तिथं दाखल केले गेले. कोयंडेनी माफी मागितल्यावर थोडा प्रकरणावर पडदा पडला. पण गुन्हे मागे घेवून मराठा कार्यकर्त्यांना सोडावे, अशी भूमिका आमदार नितेश राणे यांनी घेतली.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.