नगराध्यक्ष, निवडणुकीला आश्वासनंं दिलात त्याचंं काय झालंं ? : रूपेश राऊळ

0
373

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि.२१

आमदार दीपक केसरकरच विकास करू शकतात, हा जनतेला विश्वास असल्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांना तीन वेळा निवडून दिले आहे. तसेच त्यांनी सावंतवाडी शहराचा विकास करून दाखविला आहे. हे सर्वप्रथम आमदार केसरकर यांवर टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केले आहे.

मात्र सावंतवाडी नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या पोट निवडणुकीमध्ये दिलेले शब्द पूर्ण करू शकलेले नाहीत असे आमदार नितेश राणे व नगराध्यक्ष संजू परब आमदार केसरकर यांच्यावर बोट दाखवत आहेत. त्यावेळी त्यांची चार बोट स्वतःकडे आहेत हे विसरू नये तसेच ते धुतल्या तांदळासारखे आहेत असे भासवू नये,असे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी म्हटले आहे.

आमदार दिपक केसरकर यांनी नगराध्यक्ष, मंत्री पदाच्या काळात सावंतवाडी शहरामध्ये विविध विकास प्रकल्प राबविले आहेत ते जनतेच्या डोळ्यासमोर आहेत. त्यांचे कुटुंब सावंतवाडी शहरात दानधर्म करणारे म्हणून ओळखले जाते त्यांना बदनाम करून भाजपा आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना काही मिळणार नाही हे ध्यानात घ्यावे असे राऊळ यांनी म्हटले आहे.

आमदार नितेश राणे सावंतवाडी नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर प्रथमच आले.कोविड महामारीच्या दरम्यान सावंतवाडीकरांसाठी भाजपची सत्ता असलेल्या नगरपालिकेमध्ये साधे कोविड काळजी सेंटर उभारणीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. मात्र नगरपालिका निवडणुकीनंतर आमदार दिपक केसरकर यांच्यावर टीका करण्यासाठी सावंतवाडी मध्ये आले आणि सावंतवाडीकराना दिसले, असे रुपेश राऊळ यांनी सांगितले.

नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी शहरात ज्या ज्या घोषणा केल्या त्या पोकळ निघाल्या ते सावंतवाडी शहरात विकास करण्यात अकार्यक्षम राहिले. विकासकामांचे सोडा परंतु सावंतवाडी शहरात असलेली शांतता व स्वच्छता ठेवण्यात ते अपयशी ठरले आहेत.
आपण धुतल्या तांदळासारखे आहोत असे म्हणणारे ईडीला घाबरून भाजपवासीय झाले त्यांनी ईडीच्या धमक्या दुसऱ्यांना देऊ नये त्यामुळे जमीन घोटाळा, भ्रष्टाचार विषयी या दोघांनी बोलू नये, जनता जाणून आहे. त्यामुळे या दोघांनाही स्वतः आत्मपरीक्षण करावे असे श्री राऊळ यांनी म्हटले आहे.

पर्यटन महामंडळाच्या सावंतवाडी शहरातील विकास प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर नगराध्यक्ष संजू परब यांनी भाजपाचे आमदार तत्कालीन पर्यटनमंत्री व पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष होते त्यांची चौकशी लावण्याची मागणी करायला हवी. उलट पर्यटन महामंडळाशी संबंध नसणाऱ्या आमदार केसरकर यांच्या वर भ्रष्टाचाराचा आरोप करणे म्हणजे भाजपाच्या मंत्र्यांचे पितळ उघडे पाडण्यासारखे आहे. तसेच आपला तो बाब्या म्हणण्यासारखे आहे, असे राऊळ यांनी म्हटले आहे.

शिवसेना पक्ष आमदार केसरकर यांच्या पाठीशी ठाम उभा असून आमदार केसरकर हे अभ्यासू, दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकाटिपणी अशीच सुरू राहिल्यास शिवसेना गप्प बसणार नाही असे ते म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.