भाडे करार करण्यास नकार दिल्याने लॉटरी प्रक्रिया होऊनही गाळे ताब्यात दिले नाहीत; वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप यांची माहिती

0
682

वेंगुर्ले: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वेंगुर्ले नगरपरिषदेने आज मच्छिमार्केट मधील ११ गाळेधारकांपैकी १० गाळेधारकांसाठी लॉटरी पद्धतीने पर्यायी उपलब्ध गाळे निवडले. हे पर्यायी गाळे पहाणी केल्या नंतर गाळेधारकांना भाडेकरार पत्र करुन गाळ्यांचा ताब्या घ्या. कारण १२ वाजे पर्यंत आपल्याला याचा अहवाल जिल्हा न्यायालयात सादर करायचा असल्याचे असे मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी सांगितले. मात्र या गाळेधारकांनी आपण वकिलांशी बोलून नंतर निर्णय घेतो असे सांगितले परंतू ते वेळेत न आल्याने नगरपरिषदेने झालेल्या घडामोडिंचा अहवाल जिल्हा न्यायालयात सादर केला. तो अहवाल न्यायालयाने स्विकारला. दरम्यान याच वेळी गाळेधारकांच्या वकिलांनी जिल्हा न्यायाधिशांकडे या संदर्भात आपला अर्जही सादर केला परंतू तो न्यायालयाने फेटाळला असल्याने “गाळेधारकानी नवीन गाळे लॉटरी पद्धतीने देण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेऊन भाडे करार करण्यास नकार दिल्याने नवीन गाळे नगरपरिषदेने ताब्यात दिले नसल्याचे नगराध्यक्ष राजन गिरप यांनी सांगितले. वेंगुर्ले मच्छिमार्केट बांधकामाचा विषय सध्या गाळेधारकांच्या प्रश्नावरुन गाजत आहे. उच्च न्यायालयाने गाळेधारकांनी गाळे खाली करण्याचे अथवा नगरपरिषदेने दिलेल्या उपलब्ध पर्यायी जागेमध्ये स्थलांतरीत होण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी गाळेधारकांनी न.प.ने दिलेल्या पर्यायी जागेमध्ये अपुऱ्या सोयी असल्याचे न्यायालयात आपले म्हणणे मांडले. यावर न्यायालयाने नगरपरिषदेला ३० जुलै पर्यंत पर्यायी जागेतील त्रुटी पूर्ण करुन ३१ जुलै रोजी उपलब्ध गाळ्यांबाबत चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्यासाठी गाळेधारकांनी नगरपरिषदेमध्ये सकाळी ९.३० वाजता हजर रहाण्याच्या सूचना केल्या होत्या. ३१ जुलै रोजी हजर राहणाऱ्या गाळेधारकांना लॉटरी पद्धतीने पर्यायी उपलब्ध गाळे देण्यात यावेत आणि त्याचे करारपत्र त्याचदिवशी संध्याकाळपर्यंत न्यायालयात सादर करावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार आज नगरपरिषदेमध्ये लॉटरी पद्धतीने गाळेधारकांसाठी सोडतीचा कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता ठेवला होता. गाळेधारक ९.४० वाजता न. प. मध्ये आल्यानंतर त्यांच्या समोर प्रथम श्री साबळे यांनी न्यायालयाच्या आदेशाचे वाचन केले. आणि त्यानंतर लॉटरी पद्धतीने चिठ्ठी काढून १० गाळेधारकांसाठी पर्यायी गाळे नावाप्रमाणे निवडण्यात आले. त्यानंतर गाळेधारकांना भाडेकरार पत्र करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी गाळेधारकांनी आपल्याला पर्यायी दिलेले गाळे पहायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना न.प. तर्फे गाळे दाखविण्यात आले. मात्र गाळे पाहणी नंतर १०.४५ वाजता गाळेधारक न. प. कार्यालयात आले. त्यावेळी त्यांना भाडेकरार पत्र करा असे सांगितले असता त्यांनी वकिलांशी बोलतो असे सांगितले. त्यानंतर त्यांना यासाठी १० मिनिटाचा अवधी देवूनही ते पुन्हा न आल्याने श्री साबळे यांनी घडलेल्या घटनेप्रमाणे अहवाल तयार करुन ते ११.४५ वाजता जिल्हा न्यायालयात जाण्यासाठी निघाले. त्याचदरम्यान पुन्हा या गाळेधारकांनी न.प. मध्ये येवून एक अर्ज मुख्याधिकाऱ्यांना सादर केला. तो अर्ज स्विकारुन मुख्याधिकारी यांनी जिल्हान्यायालयात जाऊन आपला अहवाल न्यायाधीशांकडे सादर केला. तो अहवाल न्यायालयाने स्विकारला आहे. दरम्यान न्यायालयातील ईव्हीक्शन वरील अपिलाचा अंतिम निर्णय २ आॅगस्ट रोजी होणार असल्याचे नगराध्यक्ष श्री गिरप यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here