कोल्हापूर राधानगरी दाजीपूर पर्यटन सफारी प्रमाणेच सिंधुदुर्ग दाजीपुर पर्यटन सफारी सुरू व्हावी

0
396

कणकवली | प्रतिनिधी | दि.  ३० :

हिरव्या रंगाच्या नाना छटांनी, विविध प्रकारचे फुलझाडे, वन्यप्राणी, पक्षी यांनी नटलेल्या महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि पहिले अभयारण्य असलेल्या कोल्हापुरातील राधानगरी अभयारण्यातील पर्यटन वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘बस सफारी’चे उदघाटन आज कोल्हापूरचे पालकमंत्री – ना. सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय मंडलिक, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) विशाल माळी आदी उपस्थित होते.
दक्षिण व उत्तरेकडील पश्चिम घाटाला जोडणारा सह्याद्रीमधील हा महत्त्वाचा जंगलपट्टा असून जागतिक वारसा स्थळ आहे. या परिसरातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी जिल्हा वार्षिक निनियोजनातून निधी उपलब्ध करून दिला आहे
यातून कोल्हापूर वन्यजीव विभागास 15+2 सीटर बस घेतली असून ही बस दररोज कोल्हापूर ते राधानगरी दाजीपूर पर्यटन सफारी करणार आहे. एका पर्यटकांस नाममात्र रु. 300 रुपये फी मध्ये दिवसभर जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे.
राधानगरी अभयारण्यात हत्तीमहाल, बटरफ्लाय पार्क, राऊतवाडी धबधबा, माळवाडी बोटिंग व दाजीपूर गवा सफारी या सर्व ठिकाणांना भेट देता येणार आहे. आठवड्यातून एक दिवस या बसमधून जिल्हा प्रशासनातर्फे अनाथ, दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी यांना मोफत जंगल सफारी करता येणार आहे. या बसच्या आज पहिल्याच फेरीमध्ये बालकल्याण संकुलातील मुलांना राधानगरीची सफर करण्यात येणार आहे.

राधानगरी अभयारण्यात १५०० पेक्षा जास्त फुलझाडे प्रजाती, ३०० पेक्षा जास्त औषधी वनस्पती, ३५ प्रकारचे पक्षी, ३६ प्रकारच्या वन्यप्राणी प्रजाती इथे आढळतात. वाघ, बिबट्या, लहान हरीण, रानकुवा, अस्वल, गवा, सांबर, भेकर, चौसिंगा, रानडुक्कर, सािळदर, उजमांजर, खवले मांजऱ, लंगूर याबरोबरच वटवाघळाच्या तीन प्रजातीही येथे आढळतात.

त्यामुळे सिंधुदुर्गाच्या बॉर्डरवर असलेल्या दाजीपूर अभयारण्य पाहण्या साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन पर्यटन सफारी सुरू केल्यास मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गातील पर्यटकांनाही याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे भविष्यात कोल्हापूर सारखीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पर्यटन सफर सुरू करावी अशी सिंधुदुर्गवासियांची अपेक्षा व्यक्त होत आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.