राज्यात सोमवारपासून पाऊस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

0
95

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. १९ :

राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावण निर्माण होत असल्याने २० सप्टेंबरपासून तीन ते चार दिवस विविध भागांत सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. यात कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी,
तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. दोन ते तीन दिवसांत उत्तर-पश्चिाम दिशेने पुढे जाणारे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. परिणामी महाराष्ट्रातही पावसाला पोषक वातावरण निर्माण होणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात २० सप्टेंबरपासून, तर मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांत २१, २२ सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधारांचा अंदाज आहे.
उत्तर-मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत २० सप्टेंबरपासून तीन ते चार दिवस विजांच्या कडकडाटासह काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यात व मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत बुधवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस, तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत काही भागांत २०, २१ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.