श्रावणात शिवपूजेनं हमखास इच्छापूर्ती होते : ज्योतिष अभ्यासक विलास वेंदे

0
1360

मुंबई : पुराणातले समुद्रमंथन, शिवाला हिमालयात पुनः पार्वतीची प्राप्ती यासह अनेक महत्वपूर्ण घडामोडींचा हा पवित्र श्रावण महिना. या महिन्यात पूजा-अर्चा, व्रतवैकल्ये केल्यानं इच्छापूर्ती होते. या महिन्यात शिवआराधना केल्यानं कुमारिकांना इच्छित वर प्राप्त होतो. त्यामुळं या महिन्यात मनोभावे शिवआराधना करावी आणि पवित्र वातावरण ठेवावे, अशी माहिती प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक विलास वेंदे यांनी ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’ला दिली. ते म्हणाले, आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार. चातुर्मासात सर्वात श्रेष्ठ मास म्हणजे श्रावण मास. या मासात केलेली पुजा, व्रतवैकल्ये, जप यांची अत्यंत शुभ फळे मिळतात. पुराणात सांगीतल्याप्रमाणे दक्ष कन्या सतीने हिमालय राजाच्या घरी पार्वतीच्या रूपात पुनर्जन्म घेतला, कठोर तपस्या करून शिवाला प्रसन्न केले. महादेवांना सुध्दा देवी सती पार्वतीच्या पुनःप्राप्ती मुळे आनंद झाला. म्हणूनच महादेवाला श्रावण महिना अतिशय प्रिय आहे. कुमारीकांना योग्य वर प्राप्तीसाठी या मासात शिवउपासना करतात. शिवाय समुद्रमंथन देखिल श्रावण मासातच झाले होते. तेव्हा शिवाचे निळकंठ नाव प्रचलित झाले. चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रेत असताना सर्व सृष्टीवर महादेवाचा अंमल असतो. शिवकृपा व्हावी म्हणून दान, धर्म, जप उपवास केले जातात. संपूर्ण महिनाभर मांसाहार वर्ज्य केला जातो.
श्रावणातल्या पूज्य विधीबाबत ते म्हणाले, या वर्षी श्रावण महिन्यात चार सोमवार आहेत. पहिली शिवमुठ तांदूळ, दुसरी तीळ, तिसरी मुग आणि शेवटची चौथी मुठ जवस अशी अनुक्रमे चार सोमवार शिवमुठ अर्पण करायची आहे. सर्व प्रथम गणेश पुजा करूनच मग मध, साखर, दही, दुध आणि पाणी या पंचामृताने शिवाला अभिषेक करावा. बेलपत्र शमी पत्र, धोत्र्याचं फुल अर्पण करावे. बऱ्याचदा हळद कुंकू वाहिले जाते. पण तसे न करता अबीर अर्पण करावा. वरील विधी करताना शिवाचा ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी जप करावा. त्यानंतर गौरी पूजन करावे.
शिवलिंगाला अर्ध प्रदक्षिणाच घालावी. बरीच मंडळी अभिषेक केल्यावर पिंडीवरून वाहणारे तिर्थ प्राषण वगैरे करतात. जे अत्यंत चुकीचे आहे. पैसे, सुट्टी नाणी उधळू नयेत. दिवसभर उपवास करावा. श्रावण मासात दानाला खुप महत्व आहे. ते झाले पाहिजे. शिवपुजा सहपरिवार करावी. अत्यंत शुभ मानले जाते. परिवारात स्नेह, प्रेम, ऐकोपा असेल तीथे शिवकृपा असते, असे समजणे वावगे ठरणार नाही. पुढच्या पिढीसाठी सण-वार पाळा. ज्या मुळे संस्कृतीला वारसा मिळेल आणि पिढीवर संस्कार होतील, असं आवाहनही त्यांनी केलंय.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.