अवैध वाळू उपसा प्रकरणी तीन मुख्य संशयिताना पोलीस कोठडी

0
66

मालवण : कर्ली खाडी पात्रात देवबाग किनाऱ्यालगत अवैध वाळू उपसा प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या तीन मुख्य संशयितांना मालवण न्यायालयाने १५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

२ ऑक्टोबर रोजी अनधिकृत वाळू उपसा प्रकरणी स्थानिक ग्रामस्थ, महसूल विभाग, बंदर विभाग व पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईत वाळू उपसा करणाऱ्या ४ बोटी ताब्यात घेतल्या होत्या. यावर काम करणाऱ्या ४८ परप्रांतीय कामगारांसह वाळू उपसा करण्यासाठी कामगारांना घेऊन येणाऱ्या तिघा जणांसह एकूण ५१ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मालवण पोलिसांनी ४८ कामगारांना त्याचवेळी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याचवेळी जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. मात्र, सागर रामचंद्र परब, राहणार बाव कुडाळ, लीलाधर जगदीश खोत, राहणार चिपी वेंगुर्ले, मुकेश नामदेव सारंग राहणार चिपी वेंगुर्ले या तिघांचा शोध पोलिसांकडून सुरू होता. या तिघांनी वाळू उपसासाठी परप्रांतीय कामगारांना आणले होते. असा उल्लेख तक्रारीत करण्यात आला होता.

दरम्यान, तीनही मुख्य संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. या पार्श्वभूमीवर तीनही संशयित आरोपी मंगळवारी मालवण पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांना रात्री मालवण पोलिसांनी अटक केली. आज बुधवारी मालवण न्यायालयात हजर केले असता त्यांना १५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण व पोलीस पथक अधिक तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.