ओरोसमध्ये फ़िजिओथेरपी आणि रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद

0
70

कुडाळ, दि. १३ (प्रतिनिधी)

वेदना मुक्त होण्यासाठी फिजिओथेरपी सारखे वैद्यकशास्त्र नाही. शरीरावरचे दुष्परिणाम टाळून माणसांना वेदनामुक्त करता येतं याचं उत्तम शास्त्र म्हणजे फिजिओथेरपी. फिजिओथेरपी महाविद्यालयाची सिंधुदुर्गातील गरज ओळखून उमेश गाळवणकर यांनी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये फिजिओथेरपी हा अभ्यासक्रम सुरू करून सिंधुदुर्गवासियांची फार मोठी गैरसोय दूर केली आहे”, असे उद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सावंत यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवासी संकुल रहिवासी संघ ओरोस व बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय यांच्यातर्फे ओरोस न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित फिजिओथेरपी व रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “आजच्या काळामध्ये शरीरावर चे दुष्परिणाम टाळून वेदनामुक्त व्हायचं असेल तर भौतिकोपचार तथा फिजिओथेरपी सारख्या वैद्यकशास्त्र उपचारपद्धतीचा वापर करणे हे अत्यावश्यक झालेले आहे आणि बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिंधुदुर्गातील लोकांसाठी ही एक उत्तम सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यासपीठावर अशोक मराठे, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आनंद साहील, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला, डॉ. प्रगती शेटकर इत्यादी उपस्थित होते.

उमेश गाळवणकर यांनी आपल्या मनोगतामध्ये “सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सिंधुदुर्गातील जनतेलाच नव्हे तर गरजू व्यक्तींना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आपण बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विविध अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. त्याचा इथल्या जनतेने लाभ घ्यावा हीच आमच्यासाठी फार समाधानाची गोष्ट असेल. या उपक्रमामार्फत आपण थोडं समाजऋण फेडू शकलो याचे आपणास समाधान आहे”. असे सांगत समाजासाठी जे जे काही करता येईल ते ते आपण आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भविष्यात नक्कीच करू असे आश्वासनही दिले.

यावेळी ५४ रुग्णांची फिजिओथेरपीचे डॉक्टर सुरज शुक्ला, डॉ. प्रगती शेटकर यांनी तपासणी करून सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी अशा विविध आजारांची तपासणी करून त्यांनी नियमित करावयाचे सराव व औषधांची माहिती दिली. यावेळी फिजिओथेरपी चे नवीन अभ्यासक्रम शिकत असलेले विद्यार्थी, कर्मचारी आणि लाभार्थी रुग्ण व त्यांचे नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते. त्यांनी या बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या या शिबिराच्या आयोजना बद्दल व सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.