० ते ५ पटाच्या शाळा बंद करू नका !

0
217

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. १३ :

0 ते 5 पटाच्या शाळा बंद करणे बाबत शासन स्तरावरून कोणतेही स्पष्टपणे आदेश न देता पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत केवळ तोंडी सांगितले जात आहे. म्हणून शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.तरी शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता चुकीच्या कार्यपद्धतीने 0 ते 5 पटसंख्येच्या शाळा बंद करू नयेत. अन्यथा संघटनेला न्याय्य मार्गाचा अवलंब करावा लागेल, अशी मागणी व सूचना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 लक्षात घेऊन 0 ते 5 पटाच्या शाळा बंद करणे बाबत असलेली चुकीची कारवाई थांबवावी, असे समितीने निवेदनात म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगरी व सुमारे दोन हजार मिलिमीटर पेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होणाऱ्या जिल्हा आहे. म्हणून शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009च्या कलम 3 नुसार जिल्ह्यात ‘घराशेजारील शाळा’ ही संकल्पना जोर धरत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात 0 ते 5 पटाच्या शाळा सक्तीने बंद करणे योग्य होणार नाही. म्हणून प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर निवेदनातून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा हा भौगोलिक व हवामान याची विशिष्ट परिस्थिती असलेला जिल्हा आहे. म्हणून 0 ते 5 पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत असेही निवेदनातून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग शाखेचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम, सरचिटणीस सचिन मदने, शिक्षक नेते नंदकुमार राणे, उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, लवू चव्हाण, कार्याध्यक्ष नारायण नाईक, कोषाध्यक्ष लहू दहिफळे, प्रवक्ता सुनील चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.