दिवाळीपूर्वी वेतन अदा करावे | शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची मागणी

0
110

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. १४ :

माध्यमिक उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे दिवाळीपूर्वी वेतन अदा करावे, अशी मागणी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या एक महिन्यापासून कुठल्याही महिन्याचे वेतन वेळेवर मिळत नाही, त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये तीव्र नाराजी असून बऱ्याच कर्मचाऱ्यांकडे पतपेढी व बँकांचे कर्ज मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना व्याजाचा भुर्दंड बसत आहे. तसेच दिवाळी उत्सव जवळ आला असून दिवाळी पूर्वी ऑक्टोबर महिन्याचे वेतन मिळावे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची समस्या दूर करावी. त्याचप्रमाणे वेतन पथक कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालयामधून शाळेच्या मेलवर ताबडतोब माहिती पाठवा, घेऊन या असा मेसेज टाकला जातो. त्याला किमान दोन दिवसांची मुदत मिळावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली. यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे, जिल्हा सचिव गजानन नानचे, वेंगुर्ला तालुका सचिव तीमाजी गावस्कर, सावंतवाडी तालुका सचिव गजानन कानसे , रवीकमल सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.