चोरीचा बनाव करणाऱ्या त्या चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

0
418

वैभववाडी | प्रतिनिधी | दि. १४ :

एटीएममध्ये भरायला आणलेले पैस चोरीला गेल्याचा बनाव करणाऱ्या त्या चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. आज न्यायालयात चौघांनाही हजर करण्यात आले होते.या चौघांनी २३ लाख लुटल्याचा केलेला बनाव वैभववाडी पोलिसांनी उघडकीस आणला.
तळेरे-वैभववाडी मार्गावर मंगळवारी दुपारी २.३० वा.बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी आणलेली २३ लाखाची रक्कम चोरट्यांनी लुटली. अशी फिर्याद रक्कम घेऊन येणारे सगुण मनोहर केरवडेकर वय ३३ रा.केरवडे तर्फ माणगाव व त्याच्या सोबत असलेला विठ्ठल जानू खरात रा.वायंगणी वेंगुर्ले यांनी पोलीसांत देऊन बनाव केला होता. मुळात ही रक्कम चोरीला गेलीच नव्हती या दोघांसह त्याचे साथीदार निखिल सदाशिव वेंगुर्लेकर रा.कोचरे वेंगुर्ले (सध्या रा.कुडाळ),किरण प्रभाकर गावडे रा.नेरुर वाघाचीवाडी कुडाळ या चौघांनी मिळून हा बनाव केला होता. याची कबुली बुधवारी सायंकाळी विठ्ठल खरात व सगुण केरवडेकर यांनी पोलीसांत दिली.
कणकवली येथून घेतलेली २३ लाखाची रक्कम वैभववाडीकडे न आणता तळेरे येथे निखिल वेंगुर्लेकर याच्या ताब्यात दिली. निखिल याने ती २३लाखाची रक्कम बँगेसह कुडाळ येथील किरण गावडे याच्याकडे नेऊन दिली होती.पोलीसांचा लक्ष विचलित करण्यासाठी चोरीचा बनाव केला होता. मात्र वैभववाडी पोलीसांनी त्यांचा हा बनाव उघडकीस आणला.बुधवारी रात्री रोख रक्कमेसह चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच गुन्हात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
या चोरीचा चौघांनी केलेला बनाव हा योग्य नियोजन करून केला होता. घटना घडण्याच्या दिवशी एकमेकांना फोनवरून संपर्क न करण्याचे ठरले होते. जेणेकरून ते पुरावे पोलीसांना मिळू शकतील. चौघांनी एकत्रित येऊन या बनावाचा मेगा प्लान बनविला होता. त्यानुसार त्यांनी तो यशस्वी केला. मात्र पोलीसांच्या समोर त्यांचे हे पितळ उघडे पडले.
या गुन्हाचा पोलीस निरीक्षक अतुल जाधव,उपनिरीक्षक प्रविण देसाई, सुरज पाटील यांनी यशस्वी तपास केला. त्यांना पोलीस ठाण्याचे पो. ना. मारुती साखरे,पो.ना.अभिजित तावडे, पो.ना.रमेश नारनवर,पो.ना.गणेश भोवड,पो.का.संतोष शिंदे, अजय बिल्पे,चालक झुजे फर्नांडिस यांची साथ मिळाली. वैभववाडी पोलिसांच्या या कर्तबगारीच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.