‘जनआक्रोश’ आंदोलन आणखी तीव्र ; साखळी उपोषण सुरू

0
635

दोडामार्ग : बांबुळी रुग्णालयात जिल्हय़ातील रुग्णांना मोफत उपचार मिळावेत आणि दोडामार्ग तालुक्याची आरोग्ययंत्रणा सक्षम करावी, या मागणीसाठी दोडामार्गमध्ये सुरू असलेल्या जनआक्रोश आंदोलकांचे रुपांतर सोमवारी साखळी उपोषणात झाले. जोपर्यंत मागणीपूर्ण होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. जनआक्रोश आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील विविध भागातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहेत. त्यातील एका सहभागी महिलेची सोमवारी प्रकृती बिघडली. आंदोलन सुरू असतानाच ती अत्यवस्थ बनली. तिला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचरासाठी दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळीच पहिल्या टप्प्यात वैभव इनामदार सावंतवाडीतून शेतकरी नेते वसंत ऊर्फ अण्णा केसरकर, गोपाळ गवस, महेश धर्णे, संदेश गवस, मनीषा गवस, अश्विनी राऊत, गीताबाई नाईक, सुशिला परब, निकिता गावडे, शोभा गवस, मनीषा नाईक, संगिता पेडणेकर, रेश्मा जाधव, मोहिनी मळीक असे एकूण १९ आंदोलक उपोषणास बसले. सायंकाळपर्यंत एकही शासकीय अधिकारी आंदोलनस्थळी आला नाही. त्यामुळे हे साखळी उपोषण सुरूच होते. खासदार विनायक राऊत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांना भेटून त्यांनाही तातडीने साडेतीन कोटी गोव्याकडे डिपॉझिट करुन पुढील कार्यवाही तात्काळ करा. मात्र, तोपर्यंत निःशुल्क सेवा द्या, अशा सूचना केली असल्याचे सांगितले. जनआक्रोश आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा लाभत आहे. माजी आमदार पुष्पसेन सावंत, माजी आमदार शिवराम दळवी, मच्छीमार संघटनेचे नेते रवीकिरण तोरसकर आदींनी आंदोलकांची भेट देऊन पाठिंबा दिला. तसेच अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा दोडामार्ग यांनीही आंदोलकांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र सादर केले. गोव्यात रुग्णांना आकारले जाणारे शुल्क बंद केले जाणार नसेल तर येत्या ४८  तासात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दोडामार्ग शिवसेनेने दिला आहे.  शिवसेनेतर्फे गोव्यात जाणारी खडी व वाळू वाहतूक करणारे डंपर रोखत तीव्र आंदोलनास सुरुवात केले.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.