मच्छिमार बांधवांना प्रतीक्षा नारळी पुनवेची !

0
751
मालवण : देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर पावसाळ्यातील मासेमारी बंदीतील दोन महिन्याचा कालावधी हा ३१ जुलै रोजी संपला.१ ऑगस्ट पासून अधिकृत मासेमारी हंगामाला सुरुवात झाली. मात्र, नारळी पौर्णिमेला समुद्रास श्रीफळ अर्पण करून खवळलेल्या समुद्राला शांत राहण्याचे साकडे घातले जाते. त्यानंतरच खऱ्या अर्थाने सुरवात होते ती मासेमारी हंगामाला. सिंधुदुर्गाचे अर्थकारण प्रामुख्याने मासेमारीवर अवलंबून आहे. मत्स्यदुष्काळ असतो त्या वर्षी याचा परिणाम येथील अर्थकारणावर जाणवतो. विशेषतः किनारपट्टीवर याचा परिणाम जास्त जाणवतो. यावर्षी मासेमारी सुरू होण्याची शासकीय तारीख हि १ ऑगस्ट असली तरी जिल्ह्यात कित्येक वर्षांपासून नारळी पौर्णिमा हाच मुहूर्त मानला जातो. आता नारळी पौर्णिमे नंतरच खऱ्या अर्थाने मासेमारी सुरू होणार असल्याने मच्छीमारांनी बांधून ठेवलेल्या मासेमारीच्या सामानाची डागडुजी सुरू केलीय. काही जण होड्यांच्या रंगरंगोटीच्या कामात, तर काही जण जाळ्यांची साफसफाई करीत असल्याचे चित्र किनारपट्टीवर होते. कोकणचा विचार करता जूनमध्ये मासेमारी बंद केली जाते. या काळात समुद्र खवळलेला असतो. तसेच मासेही अंड्यावर असतात. त्यामुळे हा बंदीकाळ असतो. शासनाने अलीकडे या काळास अधिकृत बंदीकाळ म्हणून जाहीर केलेला असला तरी समुद्रावरच गुजराण करणारा पारंपरिक मच्छीमार समुद्राला देव मानून या काळात पिढ्यान्‌ पिढ्या मासेमारी बंद ठेवतो. पारंपरिक मच्छीमार नारळी पौर्णिमेच्या अकरा दिवस आधी घरात घटाची पूजा करतात. नारळी पौर्णिमेदिवशी घटावर ठेवलेला नारळ विधीपूर्वक वाजत-गाजत समुद्रावर नेऊन तो सागराला अर्पण केला जातो. सध्या या नारळाची बहुतांशी मच्छीमार कुटुंबामध्ये पूजा केली जात आहे. अलीकडे या व्यवसायात पारंपरिक मच्छीमारांव्यतिरिक्त इतरही समाजातील लोकांचा समावेश झालाय. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार नसलेले लोक बारमाही मासेमारी करीत असले तरी खरा मच्छीमार  मात्र आजही या परंपरा जपत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. पौर्णिमे आधीच नारळ लढवण्यास सुरवात होत असते. विविध स्पर्धाही लावल्या जातात. यावर्षषीही नगरसेवक यतीन खोत पुरस्कृत आणि शिल्पा खोत आयोजित महिलांसाठी भव्य नारळ लढवणे स्पर्धा आयोजित करण्यात आलीय. सोन्याची नथ, पैठणी, आणि आकर्षक चषक असे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तर स्वाभिमान पक्ष पुरस्कृत आणि सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित बंदर जेटी येथे भव्य नारळ लढवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली. विजेत्याला २१ हजार रुपये, ११ हजार,आणि तीन हजार अशी पारितोषिके मिळणार आहेत. माजी खासदार निलेश राणे, जुळून येती रेशीमगाठी फेम प्राजक्ता माळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशा स्पर्धा या नारळी पौर्णिमे निमित्त आयोजित केल्या आहेत. त्याशिवाय बंदर जेटी येथे लहनापासून मोठ्यांपर्यंत नारळ लढविण्यासाठी बंदर जेटी परिसर गजबजून जातो. या निमित्त मालवण, देवगड, वेंगुर्ले या किनारपट्टीवर जत्रेचे स्वरूप पाहायला मिळणार आहे. दुपारनंतर मिरवणुकीने नारळ किनाऱ्यावर आणून तो सागराला अर्पण केले जातील. त्यानंतर सागराला साकडे घातल्यानंतर खऱ्या अर्थाने मासेमारी हंगामास सुरवात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here