कॉपीमुक्त परीक्षेसाठी अतिरिक्त प्रश्नपत्रिका तयार ठेवणार – विनोद तावडे

0
788

मुंबई : दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेत कॉपीला आळा घालण्यासाठी नियमित प्रश्नपत्रिके बरोबरच एक पंचवीस हजार प्रश्नपत्रिकेचा अतिरिक्त सेट तयार ठेवण्यात येईल. पेपर फुटला किंवा व्हायरल झाल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांना अतिरिक्त सेटमधील प्रश्नपत्रिका देण्याचा पर्याय ठेवण्याचा विचार करता येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सांगितले.राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत होणारे कॉपीचे प्रकार, पुण्यात विद्यार्थिनीला विवस्त्र करून केलेली तपासणी, पेपर व्हायरल होणे याप्रश्नी आमदार विक्रम काळे, जयंत पाटील यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत आमदार तानाजी सावंत यांनी परीक्षेसाठी ३ ते ४ संच प्रश्नपत्रिकेचे ठेवावेत. त्याप्रमाणे प्रश्नपत्रिका दिल्यास कॉपीच्या प्रकारांना आळा बसेल अशी सूचना केली. तेव्हा शिक्षणमंत्री तावडे यांनी ४ संच आणि १५ लाख प्रश्नपत्रिका हे शक्य होणार नाही, परंतु कॉपीची संशयित केंद्र किंवा अशी घटना घडल्यास पर्याय म्हणून २५ हजार प्रश्नपत्रिकांचा पर्यायी अतिरिक्त संच तयार ठेवण्यात येईल असे स्पष्ट केले.परीक्षा केंद्र देण्यासाठी अनेकांचा दबाव असतो. केंद्र सोयीचे, जवळचे असावे असे वाटते. त्यामुळे केंद्र द्यावे लागते असे सांगून तावडे म्हणाले, पेपर सेटिंग आणि परीक्षा यंत्रणेशी अधिकाऱयांचा थेट संबंध नसतो. शिक्षकच ही परीक्षा प्रक्रिया पार पाडतात. अनेकदा जो पेपर सेट करतो तोच पेपर तसाच्या तसा बाहेर कसा येतो. यामुळे त्याच्याशी शिक्षकांचा संबंध असतो. त्यांच्यावर कारवाई करण्याची मानसिकता आणि हिंमत ठेवण्याची तयारी शिक्षक आमदारांनी ठेवावी, असे तावडे म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.