दशावतारी कलाकार नितीन आसयेकर यांचा महाराष्ट्र लोककला संजीवन पुरस्काराने सन्मान !

0
57

सांगली | ब्युरो न्यूज | दि. २३ :

स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, या संस्थेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने कला क्रीडा शिक्षण साहित्य संस्कृती व लोककला इत्यादी क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान व पुरस्कार प्रदान सोहळा दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी आष्टा, सांगली येथे संपन्न झाला. या समारंभामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन दशावतार लोककलेमध्ये नावलौकिक प्राप्त केलेले दशावतारी कलाकार अभिनय कुमार नितीन रामा आसयेकर यांच्या दशावतार कलेतील यशस्वी कारकिर्दीची दखल घेऊन संस्थेच्या वतीने महाराष्ट्र लोककला संजीवन पुरस्कार २०२१ हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष  विजय दणाणे, आष्टा पोलीस निरीक्षक अजित सिद्ध, कार्यक्रमाचे अध्यक्ष  मच्छीन्द्र सकटे, सिने अभिनेत्री शुभांगी गायकवाड व प्रियांका राठोड, युनिव्हर्सिटी स्टुडंट असोसिएशन अध्यक्ष प्रकाश नाईक, कुस्तीपटू सौ. कौशल्या वाघ, सिनेदिग्दर्शक चंद्रकांत निकम तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार वितरण समारंभाला नितीन आसयेकर फॅन क्लबचे संचालक विनायक भागवत विलास नाईक तसेच सदस्य  अशोक आरोलकर व  प्रदीप चव्हाण उपस्थित होते.

यावेळी  नितिन आसयेकर यांनी संस्थेचे आभार मानत अशा पुरस्कारामुळे विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल व अजून अनेक व्यक्तिमत्व या क्षेत्रामध्ये निर्माण होतील असा आशावाद व्यक्त केला व संस्थेला कला क्रीडा संस्कृती सामाजिक व लोककलेच्या क्षेत्रात भरीव कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.  हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विविध स्तरातून श्री नितिन आसयेकर यांचे अभिनंदन होत आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.