कोरोनावर कोव्हॅक्सिन लस फक्त ५० टक्केच प्रभावी !

0
224

नवी दिल्ली | ब्युरो न्यूज | दि. २५ :

कोरोनावरील कोव्हॅक्सिन ही लस केवळ पन्नास टक्केच प्रभावी असल्याचे लॅन्सेट या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. लॅन्सेट नियतकालिकामध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून कोव्हॅक्सिन लसीबाबत धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. या अभ्यासाच्या कालावधीत भारतात आढळणाऱ्या एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल ८० टक्के रुग्ण हे कोरोनाच्या ‘डेल्टा’ प्रकाराने बाधित असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

हा अभ्यास प्रामुख्याने देशात कोरोनाची दुसरी लाट सर्वाधिक गंभीर असताना करण्यात आला. या काळात दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील कोरोनाची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नमुने अभ्यासासाठी घेण्यात आले होते. या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोव्हॅक्सिन लसीचे डोस देण्यात आले होते. यातील निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर देखील कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवसांचा कालावधी झाल्यानंतर या सर्वांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले.

मात्र या अभ्यासाला अनेक मर्यादा असल्याचे संशोधकांनी मान्य केले आहे. रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या, अत्यवस्थ असणाऱ्या आणि मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाबाधितांवरील लसीच्या प्रभावाबाबत अधिक अभ्यासाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, लसीच्या परिणामकारकतेत कालानुरूप झालेला बदल या अभ्यासात तपासण्यात आला नाही, असे संशोधकांनी सांगितले.

अडीच हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभ्यास-
या अभ्यासासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील एकूण २ हजार ७१४ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यांनी १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये आरटीपीसीआर चाचणी केली होती. या सर्व कर्मचाऱ्यांना कोव्हॅक्सिन लसीचे डोस देण्यात आले होते. अभ्यासासाठी करण्यात आलेल्या चाचण्यांनंतर कोव्हॅक्सिनचे दोन डोस या कर्मचाऱ्यांवर ५० टक्के प्रभावी ठरत असल्याचं आढळून आले.

लस कमी प्रभावी ठरण्याची कारणे-
– बहुतांश कर्मचाऱ्यांच्या चाचण्या लस घेतल्याच्या पहिल्या २० दिवसांमध्ये
– कोरोना सर्वात गंभीर स्वरूपात असताना झालेला अभ्यास
– ‘हाय रिस्क’ गटात मोडणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभ्यास
– दिल्लीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट सर्वोच्च पातळीवर असताना झालेला अभ्यास
– डेल्टा व्हेरिएंट वेगाने पसरत असलेल्या काळातील अभ्यास.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.