…तर खाण कंपनीला पर्यावरण दाखला देण्यास विरोध नाही | रेडी ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत ठराव | घरांना, देवस्थानला कोणताही धोका नाही | खाण कंपनीचा निर्वाळा

0
56

वेंगुर्ले : मिनरल्स अँड मेटल्स या खाण कंपनी मार्फत नवीन जागेत होणाऱ्या मायनींगमूळे जर रेडी गावातील स्थानिकांना कोणताही त्रास होत नसेल, तसेच याठिकाणची घरे, मंदिरे यांना कोणताही धोका पोहचत नसेल आणि यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत असेल तर मायनिंगला रेडी ग्रामस्थांचा कोणताही विरोध नाही. तसेच खाण कंपनीला पर्यावरण दाखला देण्यास कोणतीच हरकत नाही. असा निर्णय बुधवारी २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या रेडी ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. याबाबत प्रांताधिकारी-सावंतवाडी, तहसीलदार-वेंगुर्ले यांना निवेदन देण्याचे ठरले असल्याची माहिती ‘सिंधुदुर्ग LIVE’ आणि ‘कोकणसाद’ शी बोलताना रेडी येथील ग्रामस्थांनी दिली आहे.

रेडी येथे सुरू असलेल्या मायनींगबाबत मिनरल्स अँड मेटल्स या खाण कंपनी विषयी २ डिसेंबर रोजी होणाऱ्या जनसुनावणी संदर्भात बुधवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंपनीने नवीन मायनींग उत्खननाबाबत आपले म्हणणे मांडले. यानंतर याबाबत नागरिकांच्या हरकती घेण्यात आल्या. यावेळी मायनींग ज्या जागेत सुरू करणार आहेत. त्या जागेतील घरे, देवस्थाने यांना कोणताही धोका न करता जर मायनींग होत असेल तर आपला कोणताही विरोध नाही असा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती येथील रेडी ग्रामस्थांनी दिली आहे.

ते वृत्त चुकीचं 

रेडी गावात गेली ७० वर्षे मायनींग व्यवसाय सुरु असून यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच कंपनीने लोकहिताचेही बरेच निर्णय रेडी गावा संदर्भात घेतले आहेत. अन्य कोणताही प्रकल्प रेडी गावात नसल्याने मायनींग शिवाय पर्याय नाही. शासनाने घातलेल्या निर्बंधांंचे पालन करूनच कंपनीला याठिकाणी काम करावे लागते. त्यामुळे खाण कंपनी गावच्या विरोधात जाऊन कोणताही निर्णय घेणार नाही. काहीजण स्वतःची पोळी भाजण्यासाठी चुकीची माहिती देऊन संभ्रम निर्माण करीत आहेत, मात्र हे चुकीचे आहे. असे मत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले. बुधवारी झालेल्या ग्रामसभेत खाण कंपनीला कोणताही विरोध झाला नसून ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्यांचा विचार झाल्यास ग्रामस्थांचे संपूर्ण सहकार्य खाण कंपनीला राहील असा निर्णय घेण्यात आला. मात्र याबाबत काही प्रसार माध्यमातून
चुकीचे वृत्त पसरवण्यात आले आहे, असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी माजी पं. स. सदस्य चित्रा कनयाळकर, ग्रामस्थ बाळू कांबळी, संदीप कांबळी, निलेश रेडकर, गोपाळ राऊळ, सागर राऊत, दत्तगुरु भगत, गोविंद गडेकर आदी उपस्थित होते.

१९५७ पासून गेली ७० वर्षे रेडी गावात मायनींग सुरू असून आजपर्यंत कंपनीने रेडी गावच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. तसेच शासनाच्या नियमांचे पालन करून मायनींग व्यवसाय सुरू ठेवला आहे. यामुळे रेडी गावात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. आज डंपर व्यावसायिकांना देखील रोजगाराची गरज आहे. निश्चितच ही गरज खाण कंपनीकडुन पूर्ण होणार आहे. तसेच कोरोना काळातही खाण कंपनीने गावात अनेक आरोग्यविषयक सुविधा राबविल्या आहेत. याचाच अर्थ खाण कंपनी रोजगारासह गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याची देखील काळजी घेत आहे. त्यामुळे याठिकाणी मायनींग व्यवसाय सुरू राहणे गरजेचे आहे.

  • बाळू कांबळी, ग्रामस्थ

 रेडी गावात मायनींग शिवाय पर्याय नसून यावर अनेकांना रोजगार मिळाला आहे. अनेक डंपर व्यावसायिक या मायनिंगवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. तसेच गावातील युवकांना खाण कंपनीमुळे रोजगारही मिळत आहे. रेडी गावाच्या सार्वजनिक हिताचा निर्णय घेऊन खाण कंपनीकडुन मायनींग सुरू होत असेल तर याला समस्त ग्रामस्थांचा विरोध नाही. मायनींग कंपनीने स्थानिकांना प्राधान्याने कामाला घ्यावे अशी मागणीही ग्रामसभेत करण्यात आली. त्यामुळे बुधवारी झालेल्या विशेष ग्रामसभेबाबत चुकीचे वृत्त न पसरविता रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावेत.

  • चित्रा कनयाळकर, माजी पं स सदस्य
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.