‘बहोत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ची सेनेनंं केली आठवण 

0
126

मुंबई : दि. २६ : देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे दर शंभरी पार गेल्याचा विषय चांगलाच चर्चेत आहे. यावरुनच आता शिवसेनेने महागाईचा मुद्दा उपस्थित करत केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारवर निशाणा साधालाय. देशातील महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढली असून सत्ताधारी मात्र यासंदर्भात काहीच बोलायला तयार नसल्याचं चित्र दिसत असल्याचं म्हणत शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय.

“‘बहोत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ या व अशा लोकप्रिय घोषणांच्या माध्यमातून देशातील जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सात वर्षांपूर्वी केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला आपल्या तमाम घोषणांचा आता विसर पडला आहे. देशातील महागाई नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच क्षेत्रांमध्ये महागाईचा जबरदस्त भडका उडाल्याने सामान्य जनतेचे जगणे असह्य झाले आहे. मात्र, दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या सत्तारूढ पक्षाचा एकही नेता-प्रवक्ता महागाईच्या मुद्दय़ावर आता तोंड उघडायला तयार नाही. अन्नधान्य, खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल, बियाणे-खते, स्वयंपाकाचा गॅस, चहा-साखर, डाळी, पीठ-मीठ आणि आता तर भाजीपालाही प्रचंड महागला आहे. तेल आणि डाळींबरोबरच भाज्यांच्या दरवाढीमुळे महिलावर्गाचे स्वयंपाकघराचे बजेट पार कोलमडून गेले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती हेच महागाईचे मूळ आहे आणि त्यामुळेच देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे,” असा उल्लेख ‘सामना’च्या अग्रलेखामध्ये करण्यात आलाय. इतकेच नाही तर पुढे, “दिवसेंदिवस उग्ररूप धारण करत असलेल्या महागाईच्या गंभीर विषयावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी धार्मिक उन्माद आणि जातीय विद्वेषाच्या भलत्यासलत्या विषयांत जनतेला गुंग करण्याचे खेळ सरकारकडून खेळले जात आहेत,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.