‘एक गाव, एक पोलीस’ ; अहवाल सादर करण्यास मालवण पोलीस ठाणे आघाडीवर

0
590
मालवण : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने राज्यभर ‘एक गाव, एक पोलीस’ ही अभिनव संकल्पना राबविली जात आहे. राज्यात प्रायोगिक तत्वावर औरंगाबाद आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या पुढाकाराने या उपक्रमासाठी सिंधुदुर्ग पोलीस सज्ज झाले आहेत. यात जिल्ह्यात मालवण पोलीस ठाणे आघाडीवर असून पोलिसांनी केलेल्या गावभेटीचा अहवालही वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला  आहे. 
राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘एक गाव एक पोलीस’ या उपक्रमासासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलिसांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावाची जबाबदारी दिली गेली आहे. त्यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील दुरावा कमी करणे व अनुचित प्रकार रोखणे पोलिसांनी सोयीस्कर होत आहे. गावागावात पोलिसांनी भेटीगाठी देत ‘एक गाव, एक पोलीस’ या उपक्रमाची माहिती देत जनजागृती सुरु केली आहे. 
मालवण पोलीस ठाण्याअंतर्गत ५० गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गावे मालवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. येथील पोलिसांवर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिलेली गावनिहाय जबाबदारी पोलीस बजावत आहेत. २६ पुरुष तर ९ महिला पोलिसांनी गावागावात जाऊन गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, राजकीय मंडळी, बचतगट, दुकानदार, ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती सदस्य तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची इत्यंभूत माहिती एकत्रित करून गावाचा परिपूर्ण अहवाल बनविला आहे. या उपक्रमाची जबाबदारी सिद्धेश चिपकर यांच्याकडे देण्यात आली होती. 
जबाबदारी दिलेल्या गावाशी कनेक्ट राहण्यासाठी गावस्तरावर प्रतिष्ठित व्यक्ती, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, राजकीय व्यक्ती, महाविद्यालयीन युवक-युवती आदींचा सोशल मीडियावर एक ग्रुप बनविण्यात आला आहे. गावात वादाची किंवा कायदा सुव्यवस्था बिघडली तर ग्रुप महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. अनुचित प्रकार, मारहाण किंवा अन्य प्रकार घडण्याची शक्यता असल्यास त्या ग्रुपवर आलेल्या पोस्टमुळे पुढील धोके टाळण्यासाठीही ग्रुपची मदत होईल. कारण आपल्या गावाला हक्काचा पोलीस मिळाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली असून पोलिसांना एकाएका गावाचे पालकत्व देण्यात आल्याने त्यांच्या जबाबदारीत मोठी वाढ झाली आहे. या उपक्रमांत कणकवली पोलीस उपविभागात मालवण तालुका आघाडीवर असून अहवाल सादर करण्याच्या बाबतीतही पोलीस ठाणे अव्वल आहे. 
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.