चिमुकल्यांच्या काव्य मैफिलीने रंगले बालकवी संमेलन

0
171

सावंतवाडी :

‘आम्ही बालकवी’ या संस्थेमार्फत लॉकडाऊन काळापासून नियमितपणे स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात आले आहेत. ‘आम्ही बालकवी’ संस्थेच्या सदर उपक्रमांना सिंधुदुर्ग आणि जिल्ह्याबाहेरुनही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ‘पहिल्या स्पर्धेतून प्रथम क्रमांक प्राप्त केलेला स्पर्धक हाच पुढील स्पर्धेचा परीक्षक असतो.’ हे या ‘बालकवी’ संस्थेने राबविलेल्या उपक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य राहिले असल्याची माहिती आयोजक प्राजक्ता आपटे यांनी दिली. हे
‘आम्ही बालकवी’ या संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय दुसरे ‘बालकवी संमेलन’ २६ डिसेंबर रोजी वेंगुर्ला शहरातील नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृह येथे उत्साहात संपन्न झाले. पेंडुर येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका देवयानी आजगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे बालकवी संमेलन पार पडले.

या संमेलनात माधव उगले, भार्गवराम उगले, चिन्मय मराठे, वेदांत पंडित, तनवी तवटे, चिन्मयी मोर्जे,अश्विनी तवटे, स्नेहल परब, प्रांजल मसुरकर, मैथिली केळुसकर, केतकी आपटे, गीता गवंडे या चिमुकल्यांनी आपल्या अंगभूत कला सादर करीत ‘बालकवी संमेलनात’ रंगत आणली. ह्या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रीतम ओगले, सीमा मराठे, रामा पोळजी, त्रिंबक आजगांवकर, प्राजक्ता आपटे, राजेंद्र गोसावी, देवयानी आजगावकर यांनीही विविध कविता, गायन, एकपात्री नाटिका सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे सेवानिवृत्त प्राध्यापक सुनील नांदोसकर यांनी चि. त्र्य. खानोलकर यांच्या ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या कवितेची निर्मिती वेंगुर्ल्यात कशी झाली, याची घटनावार सविस्तर माहिती दिली.

‘आम्ही बालकवी’ ही संस्था गेली दोन वर्षे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक पातळीवर काम करीत आहे. प्रत्येक माणूस हा शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो. लहान-मोठ्या सर्वांच्या अंतर्गत कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने ही संस्था काम करीत आहे. याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक ती आर्थिक व शैक्षणिक मदत आणि वंचित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हातभार लावणे असे विविध उपक्रम ‘आम्ही बालकवी’ ही संस्था राबवित असल्याचे यावेळी मुख्याध्यापक त्रिंबक आजगावकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील छोटे बालक असणाऱ्या बालकवींच्या सुप्तगुणांना वाव मिळावा, त्यांच्या लिहित्या हातांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून ‘आम्ही बालकवी’ या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात, असे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गोसावी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील इच्छुकांनी या संस्थेत सहभागी होण्यासाठी ‘आम्ही बालकवी’ संस्थेच्या ९४०४५९८१९३ क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन यावेळी गोसावी यांनी केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.