सर्वण-डिचोली येथे जानेवारीअखेरीस भव्य व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन

0
103
  • प्रत्येक संघात आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉलपटूंचा सहभाग

पणजी : सर्वण-डिचोली येथील सर्वण फ्रेंडस् सर्कल स्पोर्टस् अँड कल्चरल असोसिएशनतर्फे येत्या २८, २९ व ३० जानेवारी या कालावधीत व्हॉलिबॉल स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेत आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉलपटूंचा सहभाग असेल, अशी माहिती संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार डॉ. एन. सी. सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संस्थेच्या रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त भव्य स्वरुपातील व्हॉलिबॉल स्पर्धा सर्वण येथे घेण्यात आली होती. परंतु गतवर्षी कोविड-१९ निर्बंधामुळे स्पर्धा झाली नव्हती, असेही सावंत यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस स्थानिक पंच गोकुळदास सावंत, आयोजन समितीचे अध्यक्ष दत्ताराम सावंत, उपाध्यक्ष शिवानंद सावंत आणि देवानंद सावंत, सचिव योगेश सावंत, निलेश घाडी, खजिनदार विनोद सावंत, क्लबचे अध्यक्ष रूपेश सावंत, उपाध्यक्ष समीर सावंत, सचिव विनय सावंत, खजिनदार दिव्येश सावंत, व्यवस्थापक सर्वेश सावंत, सल्लागार डॉ. प्रवीण सावंत, विद्याधर सावंत, विवेक सावंत आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आयोजन समितीचे सचिव योगेश सावंत यांनी सांगितले, की या स्पर्धेत केवळ सहा संघांना प्रवेश देण्यात येईल. प्रत्येक संघात तीन खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणार आहेत. दोडामार्ग तालुक्यातील व्हॉलिबॉलप्रेमी या स्पर्धेसाठी उपस्थित राहतात. या स्पर्धेचे स्थानिक चॅनेल आणि यूट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. स्पर्धा पाहण्यासाठी खास स्टँड तयार करण्यात येणार आहे. यावर ५ ते ७ हजार प्रेक्षक बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
विजेत्या संघाला एक लाख रुपये
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक आणि एक लाख रुपये, उपविजेत्या संघाला करंडक आणि ५० हजार रुपये, उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी २५ हजार रुपये बक्षीस दिले जाईल. याशिवाय वैयक्तिक बक्षिसेही दिली जातील, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष दत्ताराम सावंत यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.