तीन राज्यात राष्ट्रवादी निवडणूक लढवणार | गोव्यात ‘आघाडी’साठी प्रयत्न : शरद पवार

0
232

मुंबई : 

पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून पाचपैकी तीन राज्यात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत युती करणार तर गोव्यात महाविकास आघाडीसाठी प्रयत्नशील असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितलं आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “गोव्यात परिवर्तनाची आवश्यकता असून जनमत भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळे या राज्यातील निवडणूक एकत्रित लढवण्यासाठी तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसशी चर्चा सुरु आहे. गोव्यात भाजपविरोधात महाविकास आघाडीसारखा प्रयोग करणार आहे.”

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत युती

देशाचं लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आता अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक ही प्रामुख्याने भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यातच लढली जाणार असल्याचं अनेक सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे. आता या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षासोबत युती करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “उत्तर प्रदेशमध्ये लोकांना आता बदल हवा आहे. समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी आणि इतर सहकारी पक्षांची युती हा लोकांसाठी पर्याय आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशची जनता आपल्याला पाठिंबा देईल.”

पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीने या निवडणुकीत भाग घेण्याचं ठरवलं आहे. तीन राज्यातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपले उमेदवार उभा करणार आहे. मणिपूरमध्ये पाच जागा लढवणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.