‘तुझी उदासी मजला ग्रासी…’वेदना स्मारकाची’..!

0
103

सावंतवाडी :

‘तुझी उदासी मजला ग्रासी मी भ्रमतो माझ्याशी…’ कविवर्य डॉ. वसंत सावंत यांनी केशवसुतांसाठी लिहिलेल्या या काव्य पंक्ती स्मारकाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा जाणवत आहेत. याला कारण ठरलय ते केशवसुत यांचं स्मारक असणारी ‘भंगलेली तुतारी’ !

सावंतवाडी शहराला ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रासह साहित्याचाही मोठा वारसा लाभला आहे. कविवर्य केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले, कविवर्य डॉ. वसंत सावंत या ख्यातनाम कवींनी याच मोती तलावकाठी अजरामर कविता लिहिल्या आहेत. केशवसुत यांनी गर्ल्स हायस्कूल अर्थात आताच्या राणी पार्वती देवी हायस्कूल इथं शिक्षक म्हणून नोकरी केली. ‘एक तुतारी द्या मज आणुनि, फुंकिन मी जी स्वप्राणाने’ ही केशवसुतांची अजरामर रचना आहे. १८९३ मध्ये ‘संध्याकाळ’ हि कविता त्यांनी सावंतवाडी इथं लिहिली होती. हि कविता मोती तलावाच्या काठावर बसून लिहिल्याचा उल्लेख डॉ. वसंत सावंत यांच्या केशवसुतांसाठी लिहिलेल्या काव्य पंक्तीत आहे. केशवसुत आणि डॉ. वसंत सावंत यांच्या या कविता मोती तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या केशवसुत कट्ट्यावर पाहायला मिळतात.

शहरामध्ये केशवसुत यांच वास्तव्य झाल्यानं सावंतवाडी नगरपरीषदेच्या माध्यमातून त्यांच्या स्मृर्तीप्रित्यर्थ मोती तलावाच्या मध्यभागी केशवसुत कट्टा हा सज्जा बांधण्यात आला. 12 नोव्हेंबर १९९७ रोजी माजी संरक्षण मंत्री शरद पवार, तत्कालीन केंद्रीय कायदा राज्यमंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते याच भूमिपूजन करण्यात आल होत. तत्कालीन नगराध्यक्ष विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या पुढाकारातून हे स्मारक उभारण्यात आल होत. दरम्यान, २०१३ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कारकिर्दीत या कट्ट्यावर ‘तुतारी’ उभारण्यात आली. तूतारी या कवितेच्या संदर्भातून हि फायबरची ‘तुतारी’ बसविण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, डॉ. महेश केळुसकर आदि मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती. मात्र, सध्या हि तुतारी शेवटच्या घटका मोजत आहेत. दुभंगेलेल्या अवस्थेत असणार हे स्मारक गेले अनेक दिवस दुर्लक्षितचं राहिले आहे. तर केशवसुत, डॉ. वसंत सावंत यांच्या कट्ट्यावरील भिंतीवर कोरलेल्या कवितांची देखील दुरावस्था झाली आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधीनी याची दखल न घेतल्यानं साहित्य प्रेमींनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

केशवसूत कट्टा हा सावंतवाडीच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारा असून गेली अनेक वर्षे साहित्यिकांचे कार्यक्रम, शूरवीरांना श्रद्धांजली आदि कार्यक्रम याठिकाणी होत आहेत. लेखक, कवी, साहित्यिक यांच्या विचारमंथनाचे हे एक व्यासपीठ आहे. याच ठिकाणी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुद्धा झाले आहे. तर गतवर्षी संजू परब यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शिवजयंती उत्सवही याठिकाणी सुरु करण्यात आला. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा मानस आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला होता. मात्र, एका स्मारकावर दुसर स्मारक नको, अस सांगत विरोधी गटाच्या नगरसेवकांनी याला विरोध केला. दरम्यान, छत्रपतीचं हे भव्य स्मारक शिवउद्यानाच्या समोर होत असून माजी खासदार निलेश राणेंच्या उपस्थितीत त्याच भूमिपूजन झाल आहे.

प्रशासनाच दुर्लक्ष ?

शहरातील ऐतिहासिक मोती तलावाच्या मध्यभागी हा केशवसुत कट्टा असून नुकतचं हा कट्टा आणि पूल वापरास धोकादायक असल्याचे सूचना फलक प्रशासनाकडून लावण्यात आले होते. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा कट्टा आणि पूल धोकादायक झाल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यानुसार कट्ट्यावरील तुतारीसह डॉ. वसंत सावंत मार्गाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर धोकादायक असल्याचे फलक लावले होते. मात्र, सध्या हे फलक दिसत नसून नागरिक या पुलाचा वापर करताना दिसून येत आहेत. नगरपरिषद बैठकीत केशवसुत कट्ट्याच्या विषयावरून चर्चा झाली होती. यावेळी या कट्ट्याचे बांधकाम जुने असल्यामुळे ते नागरिकांच्या वापरासाठी धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले होते. तलावाच्या मधोमध हा भाग असल्याने जीर्ण बांधकाम तलावात कोसळून हानी होऊ शकते, अशी शक्‍यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार ही जागा धोकादायक असल्याचे सूचना फलक येथे लावले होते. मात्र, सध्यस्थितीत हे फलकही दिसत नसून सायंकाळच्या वेळी तसेच रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी नागरिक दिसतात. येथील चैतन्यमय वातावरणाचा, थंडगार परिसराचा आनंद लुटतात. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी इथे दिसून येते. तर सावंतवाडीतून जाणारे पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देतात.

या स्मारकाला अनेक वर्ष झाली आहेत. उन-पावसात हि अवस्था होण सहाजिक आहे. मात्र, आज जी परिस्थिती निर्माण झालीय ती पुन्हा होऊ नये यासाठी संबंधित तज्ञांकडून त्याची पुनरउभारणी होण आवश्यक आहे. तर प्रशासन गतिमान होण्यासाठी नागरिकांनी देखील पुढाकार घेण आवश्यक आहे. पावसाला वगळता, किमान 8 महिने याठिकाणी कार्यक्रम होणे आवश्यक आहे. साहित्य प्रेमींनी त्यासाठी पुढाकार घेण गरजेचं असून त्यामुळे हि वास्तू जपली जाईल.

: डॉ. मधुकर घारपुरे

ज्यावेळी एखाद स्मारक उभारलं जात त्यावेळी त्याच्या देखबाल दुरुस्तीचीही जबाबदारी घेण आवश्यक आहे. नुसत स्मारक उभारलं आणि जबाबदारी संपली अस होत नाही. ज्या अवस्थेत तुतारी आहे हे पाहण अत्यंत दुर्दैवी आहे. ज्यावेळी पर्यटक याठिकाणी येतात या तुतारीसह स्लेफी घेतात त्यावेळी भंगलेली तुतारी त्या फोटोत येते. या तुतारीच्या डागडुजीसाठी आम्ही देखील प्रयत्न केले. सर्व लोकप्रतिनिधीना या संदर्भात माहिती देखील दिली. परंतु त्याचं तेवढ महत्व त्यांना समजल नसावं. त्यामुळे ज्यावेळी स्मारक उभाराल त्यावेळी त्याची जबबदारी देखील घ्यावी.

: दत्तप्रसाद गोठसकर

अशी माणस सावंतवाडीत होऊन गेली हे आमच भाग्य आहे. मात्र, तुतारीची झालेली अवस्था पाहता मनाला फार व्यातना होत आहेत. परंतु, ज्या लोकांशी हे संबंधित आहे त्यांना याच्याशी काही देणघेण नाही हे दुर्देंव आहे. कितीही साहित्य प्रेमी असला, कविता शोकीन असला तरी जर उपद्रव शक्ती नसेल तर त्याकडे फारस लक्ष दिल जात नाही. या स्मारकासोबत हेचं होत आहे. याठिकाणी येणाऱ्या विदेशी पर्यटकांकडून ‘व्हॉट दिझ रबिश’ असे उद्गार येतात. मात्र, त्यांच्यासमोर आम्ही हतबल असतो. तुतारी कवितेचे बोल आठवताना हि तुतारी पाहून कुठेतरी निष्प्राण झालेली तुतारी दिसते.

: शंकर प्रभू

केशवसुत यांच्या वास्तव्यामुळे सावंतवाडी आणि केशवसुत या नात्याला भावनिक किनार आहे. मात्र, त्यांच्या स्मारकाची होणारी विटंबना, त्याकडे प्रशासनाच होणार दुर्लक्ष पाहता याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ साहित्यिक, देश-विदेशातले पर्यटक याठिकाणी येतात त्यामुळे त्यांच्यासमोर भंगलेली तुतारी दाखवायची का ? हा प्रश्न उपस्थित होतोय. सावंतवाडी नगरपरिदेचा कारभार सध्या प्रशासक हाकत असून याची दखल घेत तात्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी साहित्यप्रेमीमधून होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.